‘आप’चे लक्ष आता हिमाचल प्रदेशकडे; पंजाबमधील विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 08:37 AM2022-03-14T08:37:59+5:302022-03-14T08:38:05+5:30
पंजाबमध्ये सामान्य जनतेचाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने आता शेजारच्या हिमाचल प्रदेशातही पाय पसरण्याची तयारी शुरू केली असून, विधानसभेच्या सर्व ६८ जागांवर निवडणूक लढविणार आहे. हिमाचल प्रदेशात याचवर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी हिमाचल प्रदेशच्या भेटीदरम्यान सांगितले की, पंजाबमध्ये सामान्य जनतेचाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. पंजाबच्या जनतेने दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील आम आदमी पार्टीच्या सरकारने केलेल्या कामाला पसंती दिली. आगामी काळात हिमाचल प्रदेशातील जनताही पसंती देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीचे सरकार आल्यास कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या उपस्थितीत धर्मशाला विधानसभा मतदारसंघातून १७ हजार मते मिळविणारे राकेश चौधरी आणि शिमला महापालिकचे माजी नगरसेवक गौरव शर्मा हेही ‘आप’मध्ये सामील झाले आहेत. हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होत आली आहे. मंडी लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघातील अलीकडेच झालेली पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने सत्तारूढ भाजपवर मात केली होती. ‘आप’ने हिमाचल प्रदेशात जम बसविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.