मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग
By प्रसाद आर्वीकर | Published: April 15, 2024 05:59 AM2024-04-15T05:59:00+5:302024-04-15T06:00:19+5:30
राज्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर लोकसभा काबीज करण्याची ‘आप’ची रणनीती कितपत यशस्वी होते, याची सध्या तरी उत्सुकता आहे.
प्रसाद आर्वीकर, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा घेऊन लोकसभा काबीज करण्याचे मनसुबे बांधत पंजाबमध्येआम आदमी पार्टीने राज्य मंत्रिमंडळातील पाच कॅबिनेट मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. राज्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर लोकसभा काबीज करण्याची ‘आप’ची रणनीती कितपत यशस्वी होते, याची सध्या तरी उत्सुकता आहे.
निवडणुकांचा शेवटचा टप्पा असल्याने इतर पक्षांनी अजून तरी येथे गडबड केलेली नाही. मात्र, आम आदमी पार्टीने रणनीती निश्चित केली आहे. एक वर्षांत आपने लोकहिताची अनेक कामे केल्याचा दावा केला आहे. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच पद्धतीची विकासकामे लोकसभेच्या माध्यमातून केली जातील, हे पटवून द्या, असे निर्देश मुख्यमंत्र मान आणि आपचे पंजाब प्रभारी पाठक यांनी उमेदवारांना दिले आहेत.
पंजाबमधील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरच आहे. त्यामुळे मागच्या आठवडापासून भगवंत मान हे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेऊन आपच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
दगाफटका होऊ नये
विधानसभेच्या भरवशावरच आपने राज्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये या उद्देशाने थेट मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांनाच लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्या त्या मतदारसंघात मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’चा वापर आपने केला आहे.
लढतीतील कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ उमेदवार
अमृतसर कुलदीप धालीवाल
खडूर साहिब लालजित भुल्लर
बठिंडा गुरुमितसिंह खुड्डिया
संगरुर गुरुमीतसिंह मीत हेयर
पटियाला डॉ. बलबीर सिंह
पंजाबी ॲक्टर अनमोलही...
मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती ओळखले जाणारे पंजाबी कलाकार कर्मजित अनमोल यांना फरीदकोट या राखीव मतदारसंघातून आपने उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी शैक्षणिक जीवनापासून त्यांची मैत्री आहे.
भाजपने आयात करून दिले उमेदवार
- भाजपने ६ उमेदवारांच्या नावांची घोषणा येथे केली आहे. त्यातील बहुतांश उमेदवार हे काँग्रेस आणि आपमधून आयात केेलेले आहेत.
- २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत मात्र स्वकीयांशीच लढावे लागणार आहे.
- पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणार असल्याने उमेदवार जाहीर करण्यासाठी पुरेसा वेळ घेतला जात आहे.