‘आप’ने ढवळला गोवा!
By admin | Published: May 24, 2016 02:53 AM2016-05-24T02:53:20+5:302016-05-24T02:53:20+5:30
आम आदमी पार्टीचे राज्यभर फिरणारे कार्यकर्ते आणि पक्षप्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याला दिलेली भेट व घेतलेल्या सभेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे.
पणजी : आम आदमी पार्टीचे राज्यभर फिरणारे कार्यकर्ते आणि पक्षप्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याला दिलेली भेट व घेतलेल्या सभेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’चे भवितव्य काय असेल, या विषयी उत्सुकता असून पक्षाच्या सक्रियतेमुळे विरोधी पक्ष काँग्रेस व सत्ताधारी भाजपा सतर्क झाले आहेत.
केजरीवाल यांची कांपाल येथील मैदानावर रविवारी प्रभावी सभा झाली. हजारो गोमंतकीय सभेसाठी व केजरीवाल यांचे भाषण ऐकण्यासाठी कांपालला आले होते, ही वस्तुस्थिती आहे. गोव्यात ‘आप’चा एकही आमदार किंवा नगराध्यक्ष किंवा जिल्हा पंचायत सदस्य नसतानाही केवळ कार्यकर्त्यांनीच गोवाभर फिरून सभेला गर्दी जमविली.
काँग्रेसलाच ‘आप’कडून प्रथम धक्का दिला जाईल, असे भाजपाला व खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही वाटते. केजरीवाल यांच्या सभेला आलेल्या लोकांमध्ये दक्षिण गोव्यातील बराच ख्रिस्ती मतदार होता. ‘आप’च्या सदस्यांमध्येही गोव्यातील अनेक शिक्षित व उच्च शिक्षित ख्रिस्ती बांधव आहेत. त्यामुळे ‘आप’चा प्रभाव आणखी वाढला, तर पहिली चिंता काँग्रेसलाच करावी लागेल; मात्र आता ‘आप’चे समर्थन करणाऱ्यांपैकी बहुतेकांनी २०१२ साली भाजपाला मते दिली होती व त्यांच्यात आता अपेक्षाभंग झाल्याची भावना आहे.
‘आप’ने सभेवेळी जो खर्च केला, त्याचा हिशेब द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार व उपसभापती विष्णू वाघ यांनी केली. त्यावर भाजपा सरकारने आपचा खर्च व देणग्या याबाबत चौकशी करून घ्यावी, असे आव्हान ‘आप’चे आशुतोष यांनी दिले. (खास प्रतिनिधी)
केजरीवालांचे ‘भक्त’
अरविंद केजरीवाल यांनी देशाच्या विविध भागांतील लोकांच्या मनावर ‘मोहिनी’ केली आहे. त्यांची कार्यशैली, पारदर्शक व्यवहार पाहून दिल्ली व पंजाबमध्ये जसे त्यांचे भक्त तयार झाले, तशीच स्थिती गोव्यात निर्माण होत आहे. त्याची प्रचिती सोमवारी केजरीवाल यांच्या येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात सभेत आली. युवक-युवती व महिला सभेला आल्या होत्या.
...तर आत्ताच पक्ष सोडा!
‘आप’मध्ये कुणाला पैसे मिळत नाहीत. लोभ, अभिलाषा किंवा तिकिटाची अपेक्षा जर कुणाला असेल, तर त्यांनी आताच पक्ष सोडावा; अन्यथा लोभी व्यक्तींच्या वाट्याला नंतर अपेक्षाभंग वाट्याला येईल, असे केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितले.
गोव्यातही लोक भाजपा व काँग्रेसला कंटाळले आहेत. गोमंतकीयांनी दोन्ही पक्षांवरील निष्ठा विसरून राज्याची
सूत्रे स्वत: हाती घ्यावी. गोव्यातील
आम आदमीनेच गोव्याचा कारभार चालवावा, अशी हाक केजरीवाल
यांनी दिली.
भाजपाला देणगीच्या रुपात ८० टक्के पैसा हा बेहिशेबी स्रोतांमधून येतो. आम्ही ‘आप’च्या देणग्या व खर्च याबाबतचा हिशेब घेऊन सार्वजनिक व्यासपीठावर येतो, भाजपानेही तसेच हिशोब घेऊन यावे.
- वाल्मिकी नायक, ‘आप’चे नेते