‘आप’वाद झाला अधिकृत

By Admin | Published: March 10, 2015 11:43 PM2015-03-10T23:43:03+5:302015-03-10T23:43:03+5:30

आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासह

'Aap' has become official | ‘आप’वाद झाला अधिकृत

‘आप’वाद झाला अधिकृत

googlenewsNext

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासह पक्षाचा पराभव व्हावा यासाठीच भूषण पिता- पुत्र (शांती भूषण- प्रशांत भूषण) व योगेंद्र यादव काम करीत होते, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. त्यांचे पहिले अधिकृत निवेदन मंगळवारी जारी केले.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने प्रशांत भूषण व यादव यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी केल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, वाहतूक मंत्री गोपाल राय, सरचिटणीस पंकज गुप्ता आणि संजय सिंग यांनी या निर्णयाचे समर्थन केले.
‘‘या तिघांनी, विशेषत: प्रशांत भूषण यांनी बाहेरील राज्यांतून प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी मी पक्षाचा प्रचार करणार नाही, तुम्हीही करू नका. पराभव झाला तरच केजरीवालांना थोडी समज येईल, असे धक्कादायक विधान केले होते. पक्षाला कुणी निधी देत असेल तर तोही थांबवावा,’’ असे भूषण यांनी आपच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांच्या व म्हैसूरच्या कार्यकर्त्यांसमक्ष म्हटल्याचा उल्लेख सिसोदिया व इतरांनी निवेदनात केला.
या तिघांची पक्षाच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून केजरीवाल यांना हटविण्याची इच्छा होती. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी आशिष खेतान यांनी प्रशांत भूषण यांना फोन करून दिल्लीतील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केला असता प्रशांत भूषण यांनी पक्ष पराभूत व्हावा, केवळ २० ते २२ जागा मिळाल्यास केजरीवालांना समज येईल असे विधान केले होते. भाजपने जोरदार प्रचार चालविला असता आपचे ज्येष्ठ नेते या तिघांची समजूत घालण्यात अमूल्य वेळ वाया घालवत होते, अशी माहिती या निवेदनात दिली आहे.
यादव यांनी काही ध्वनिमुद्रित माहिती देऊन केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शांती भूषण यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना केवळ समर्थनच दिले नाही, तर आपमधून बाहेर पडलेल्या स्वयंसेवी विचार मंचालाही उघड उघड पाठिंबा दिला. मतदानाच्या काही दिवस आधी शांती भूषण यांनी केजरीवालांपेक्षा बेदी अधिक विश्वसनीय असल्याचे विधान केले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्याबाबत विचारणा चालविली होती. शांती भूषण यांनी केजरीवालविरोधी विधानांचा सपाटाच लावला होता, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. पीएसीमधून वगळण्याचा निर्णय बेजबाबदार आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप या तिघांनी केला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Aap' has become official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.