'आप'कडून मुख्यमंत्र्यांचे आभार अन् फडणवीसांना टोलाही लगावला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:33 PM2019-07-17T20:33:06+5:302019-07-17T20:35:24+5:30
युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत देण्याचा निर्णय हा कौतुकास्पद असून ही मूळ संकल्पना आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची असल्याचेही आपने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयासंदर्भातील एक बातमी ट्विटरवर शेअर करुन आपने राजकीय सीमारेषा ओलांडल्याबद्दल आभार, असे म्हटले आहे.
युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांऐवजी 1 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तसेच, देशांतर्गत सुरक्षा करताना शहीद झाल्यास सुरक्षा जवान, निमलष्करी जवान, सैन्यातील जवानांच्या कुटुंबीयांना ही 1 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे आम आदमी पक्षांकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच, या निर्णयाबद्दल आभारही मानले आहेत.
Thank you @Dev_Fadnavis for leaving aside political boundaries and replicating @ArvindKejriwal's idea in Maharashtra.
— AAP (@AamAadmiParty) July 17, 2019
Surely, the amount won't compensate Martyrs' families' loss, but it would at least ensure good future of them. Our martyrs deserve this! https://t.co/PuUF8MeG2h
आपण राजकीय सीमारेषा ओलांडत जवानांच्या कुटुंबीयांसाठी अरविंद केजरीवाल यांची संकल्पना राबवत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. नक्कीच 1 कोटी रुपयांनी शहीदांच्या कुटुबीयांचे दु:ख भरून येणार नाही. मात्र, या कुटुंबीयांच्या भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होईल. आपले शहीद जवान यासाठी पात्र आहेत, असे ट्विट आम आदमी पक्षाने केले आहे. तसेच, आपकडून एक व्यंगात्मक फोटोही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अरविंद केजरीवाल शहीद जवानाच्या कुटुबीयांकडे 1 कोटी रुपयांचा चेक देत आहेत. तर बाजुलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहून आता आम्हीही शहिदांच्या कुटुंबीयास 1 कोटींची मदत देणार, असे म्हणत असल्याचे लिहिले आहेत. तसेच, कहाँ था ना हम राजनिधी बदलने आये है! असेही आपच्या या ट्विटमध्ये लिहिले आहे.