स्वाती मालीवाल प्रकरणी ‘आप’ कोंडीत; केजरीवालांचे मौन, पोलिसांनी नोंदवला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:23 AM2024-05-17T09:23:20+5:302024-05-17T09:23:43+5:30
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची ऐन लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोंडी झाली आहे.
मालीवाल यांच्या निवासस्थानी तीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नाेंदवून घेतला आहे. त्यामुळे ‘आप’वर दबाव वाढला.
आज लखनौमध्ये प्रचारासाठी पोहोचलेले केजरीवाल यांना याप्रकरणी पत्रकारांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागले; पण केजरीवाल यांनी मौन बाळगले आणि त्यांचा बचाव संजय सिंह यांना करावा लागला. दिल्लीत महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मालीवाल यांच्याशी झालेले गैरवर्तन, मणिपूरच्या महिलांची निर्वस्त्र धिंड व प्रज्वल रेवण्णाप्रकरणावरुन संजय सिंह यांनी भाजपवर सवाल करीत प्रश्न परतावून लावण्याचा प्रयत्न केला.
विभवकुमारला अटक का नाही? भाजपचा सवाल
संजय सिंह यांनी कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याऐवजी विभवकुमार केजरीवाल यांच्यासोबत फिरत आहेत आणि याप्रकरणी केजरीवाल यांनी चकार शब्द उच्चारलेला नाही, अशी टीका भाजपच्या प्रवक्त्या शाझिया इल्मी यांनी केली.
विभवकुमारला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस
राष्ट्रीय महिला आयोगाने स्वयंस्फूर्तपणे दखल घेत मालीवाल यांना मारहाण करणारे केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांना त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
माझ्यासोबत जे झाले ते अत्यंत वाईट होते. झालेल्या प्रकाराबाबत मी पोलिसांत जाब नोंदविला आहे. मला आशा आहे की, पोलिस यावर योग्य कारवाई करतील. गेले काही दिवस माझ्यासाठी अत्यंत वाईट होते. चारित्र्यहनन करण्यासाठी काही जण म्हणत आहेत की, दुसऱ्या राजकीय पक्षांच्या सांगण्यानुसार मी हे करीत आहे, देव त्या सर्वांना आनंदात ठेवो! - स्वाती मालीवाल, खासदार, राज्यसभा, आम आदमी पार्टी