AAP In Gujarat: राज्यातील सर्व संघटना बरखास्त; गुजरात विधानसभेची आपने आखली रणनिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 02:28 PM2022-06-08T14:28:38+5:302022-06-08T14:28:49+5:30
AAP In Gujarat: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत आप राज्यातील सर्व 182 जागा लढवणार आहे.
Gujarat Assembly Election: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आपनेगुजरातमधीलआपल्या सर्व संघटना बरखास्त केल्या आहेत. गुजरातमध्ये आपचे प्रमुख गोपाल इटालिया वगळता सर्व संघटना बरखास्तर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व संघटना, शाखा आणि मीडिया टीमचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. आता पक्ष लवकरच नव्या संघटनेची घोषणा करू शकतो.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्ष आता पूर्णपणे नवीन संघटना स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील निवडणुकीसाठी पक्षाने आपली पूर्ण ताकद लावली असून आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. नुकतेच केजरीवाल मेहसाणा येथे तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
लवकरच नवीन नियुक्त्या होतील
पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते आम आदमी पक्षात दाखल झाले आहेत. अशा स्थितीत त्यांना संघटनेत स्थान देण्यासाठी आणि विधानसभेसाठी रणनीती तयार करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी गुजरातच्या 33 जिल्हाध्यक्षांसह सुमारे 50 पदांवर नवीन नियुक्त्या करणार आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते, माध्यम प्रभारी आदी पदांचा समावेश आहे.
जनतेमध्ये विश्वासार्हता असलेले नेते सहभागी होऊ शकतात
आता आपला संघटनेची पुनर्रचना करायची असून, जनतेचा विश्वास असलेल्या लोकांना पुढे आणायचे आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आतापर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही, पण यावेळी काँग्रेसवर नाराज आणि निराश झालेल्या लोकांची मते मिळवण्यात ते यशस्वी होतील, अशी आशा आहे. राज्यातील विधानसभेच्या सर्व 182 जागा लढवण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.