केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 01:57 PM2024-11-17T13:57:22+5:302024-11-17T13:58:06+5:30

दिल्ली सरकारमधील मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्रीपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

AAP' Kailash Gehlot Resign, Big blow to Arvind Kejriwal | केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

केजरीवालांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडली, आपने भाजपवर केला ED कारवाईचा आरोप...

Kailash Gehlot Resigns: दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीच्या आतिशी सरकारमधील परिवहन मंत्री आणि आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते कैलाश गेहलोत (Kailash Gehlot) यांनी आज अचानक मंत्रीपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे.

पक्षावर गंभीर आरोप

कैलाश गेहलोत यांनी राजीनामा देताना पक्षावर काही गंभीर आरोपही केले. गेहलोत यांनी केजरीवालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आम आदमी पक्षासमोर गंभीर आव्हाने आहेत. ज्या मूल्यांनी आपल्याला 'आप'मध्ये एकत्र आणले, त्याच मूल्यांचे आव्हान पक्षासमोर आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेने जनतेशी असलेल्या बांधिलकीला मागे टाकले आहे. यामुळे जनतेला दिलेली अनेक आश्वासने अपूर्ण राहिली आहेत.'

यमुना स्वच्छतेचे उदाहरण 
'उदाहरणार्थ, आपण यमुनेला स्वच्छ नदी बनवण्याचे वचन दिले होते, परंतु आपण ते आजपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आता यमुना नदी पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. आणखी एक क्लेशदायक गोष्ट म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आपण केवळ आपल्या राजकीय अजेंडासाठी लढत आहोत. त्यामुळे दिल्लीतील लोकांना मुलभूत सेवाही पुरविण्यात अडचणी येत आहेत.'

आपण आजही 'आम आदमी' आहोत का?'
कैलाश गेहलोत पुढे लिहितात, 'शीशमहल(केजरीवालांचे निवासस्थान) सारखे अनेक लज्जास्पद आणि विचित्र वाद आहेत, ज्यामुळे आपल्या सर्वांवर, खरंच आपण 'आम आदमी' आहोत का? असा प्रश्न उपस्थित करतात. दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्राशी भांडण्यात घालवत असेल, तर दिल्लीचा विकास कधीही होणार नाही.'

दिल्लीच्या लोकांसी सेवा करण्यासाठी...
ते शेवटी म्हणथात, 'दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आणि मला पुढेही ठेवायचे आहे. त्यामुळेच 'आप'पासून दूर जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळेच मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला संधी दिली, आमदार-मंत्री केले, त्याबद्दल धन्यवाद.'

भाजपने केले स्वागत
भाजप नेत्यांनी कैलाश गेहलोत यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे आम आदमी पार्टी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका केली आहे.

आपचा भाजपवर आरोप
कैलाश गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणाले की, भाजप पुन्हा एकदा आपल्या कटात यशस्वी झाला. भाजप अनेक दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून गेहलोत यांच्यावर दबाव आणत होता. कोणत्याही विरोधी नेत्यावर कारवाई झाली की, भाजपचे लोक खूप गोंधळ घालतात आणि जेव्हा तो राजीनामा देऊन भाजपमध्ये जातो, तेव्हा त्यांची सर्व पापे 'मोदी वॉशिंग पावडर'ने धुऊन जातात.

Web Title: AAP' Kailash Gehlot Resign, Big blow to Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.