आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 04:40 PM2024-10-18T16:40:07+5:302024-10-18T16:41:06+5:30
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
नवी दिल्ली: दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना तब्बल 18 महिन्यानंतर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला असून, जामीन काळात ते देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. ईडीने सत्येंद्र जैन यांच्या जामिनाला विरोध केला होता, 18 महिने शिक्षा भोगल्याचे कारण देत न्यायालयाने 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जैन यांना जामीन दिला.
AAP नेते सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. जैन यांना गेल्या वर्षी मे महिन्यात आरोग्याच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. ते 10 महिने जामीनावर बाहेर होते, मात्र या वर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. 18 मार्च रोजी त्यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यानंतर आता अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
#WATCH | Counsel for Satyendar Jain, Vivek Jain says, "Rouse Avenue Trial Court has granted bail to Satyendar Jain. The trial court said that he has suffered a long incarceration...Most likely he will come out today..." https://t.co/zWE6C8ihrOpic.twitter.com/zO27GxZxMj
— ANI (@ANI) October 18, 2024
सत्येंद्र जैन यांना मिळालेला जामीन पक्षासाठी दिलासा देणारा आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असतानाच हा जामीन मंजूर करण्यात आल्याने पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, सत्येंद्र जैन यांच्यापूर्वी आपचे सर्व बडे नेते तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना न्यायालयाकडून यापूर्वीच जामीन मिळाला आहे.