अखेर नऊ दिवसानंतर केजरीवालांचे ठिय्या आंदोलन मागे; IAS अधिकाऱ्यांशी चर्चेचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 07:06 PM2018-06-19T19:06:11+5:302018-06-19T19:19:04+5:30
चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्यामुळे राज्यपाल अनिल बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या नऊ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी सुरू असलेले आपले आंदोलन अखेर मागे घेतले आहे. आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, अशा आशयाचे पत्र राज्यपालांनी दिल्यानंतर केजरीवालांनी हा निर्णय घेतला. थोड्याच वेळात मुख्यमंत्री केजरीवाल आणि आयएएस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
केजरीवालांच्या या ठिय्या आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण तापले होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वारंवार मागणी करूनही राज्यपाल अनिल बैजल प्रतिसाद देत नसल्यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी हे आंदोलन पुकारले होते. या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय हे दोन मंत्री ११ जूनपासून राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणे धरून बसले होते.
या आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यांनी पाठिंबा दिल्यामुळे केजरीवालांची बाजू भक्कम झाली होती. त्यामुळे अनिल बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता. अखेर त्यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाची दखल घेत चर्चेची तयारी दाखविली. त्यानंतर केजरीवालांनी मंगळवारी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
#Delhi Chief Minister Arvind Kejriwal ends his strike at Lieutenant Governor's house, called against alleged strike of IAS officers in #Delhipic.twitter.com/kK5BsgeciK
— ANI (@ANI) June 19, 2018