Punjab Election Results 2022: 'भाजपा'साठी आता 'आप'चा धोका?, BJP नेते म्हणाले...'भविष्यात अडचणी वाढू शकतात!'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:28 AM2022-03-11T10:28:28+5:302022-03-11T10:29:28+5:30
Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Punjab Election Results 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच 'आप'चं सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं पंजाबच्या ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर यश प्राप्त केलं. आम आदमी पक्षाच्या या ऐतिहासिक विजयानंतर आता भाजपाला राष्ट्रीय पातळीवर नवा धोका निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. भाजपा नेत्यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.
पंजाबमधील 'आप'च्या विजयाचा अर्थ भाजपासाठी धोका असं अजिबात म्हणता येणार नाही, असं भाजपाच्या काही नेत्यांनी म्हटलं आहे. आम आदमी पक्षाला भाजपसोबत लढायचे असेल तर त्यांनी लोकसभेच्या किमान १०० जागा जिंकल्या पाहिजेत, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. पण मुख्य पक्ष म्हणून 'आप'ची वाढ कुठेतरी भाजपविरोधी मतांची विभागणी करेल असंही काहींनी म्हटलं आहे.
'आप'मुळे भाजपविरोधी मतांची विभागणी होऊ शकते
"अँटी बीजेपी मतांची पोकळी आहे. पुढील २० वर्षातही भाजप सत्तेतच राहणार आहे. मात्र, काँग्रेसची स्थिती कमकुवत झाल्यानंतर भाजपविरोधी मते आम आदमी पक्षाच्या बाजूने पडण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून उदयास येण्यासाठी 'आप'ला लोकसभेत किमान 100 जागा जिंकाव्या लागतील. मात्र, 'आप'ची रणनीती काहीशी भाजपच्या रणनितीशी मिळतीजुळती असल्याचे काही नेत्यांनी सांगितले. कारण तेही विकासाचा अजेंडा घेऊन मोठा पक्ष बनू पाहत आहेत", असं भाजपाचे ज्येष्ठ नेते पी.मुरलीधर राव म्हणाले.
'आप' भविष्यात भाजपला अडचणीत आणू शकते?
"आप कल्याणकारी राजकारणात गुंतत आहे आणि एक मजबूत आणि करिश्माई नेत्याच्या (अरविंद केजरीवाल) नेतृत्वाखाली पुढे जात आहे. हा पक्ष दुर्बल घटकांनाही आकर्षित करत आहे. दुर्बल घटकातील मतदारांनीही 'आप'वर पूर्ण विश्वास दाखवला आहे. पुढे जाण्यासाठी हे आपल्यासाठी चांगले सिद्ध होणार नाही. पण अर्थातच पुढे काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही", असंही भाजपा नेते पी. मुरलीधर राव म्हणाले. तसंच महिला आणि दुर्बल घटकांमध्ये AAP ची वाढती लोकप्रियता AAP ला मजबूत आणि मोठा पक्ष बनवू शकते, अशीही कबुली त्यांनी दिली.