आप म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो'! भाजपाची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:50 AM2018-06-18T11:50:53+5:302018-06-18T12:18:33+5:30
आम आदमी पक्ष म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो,' अशी खरमरीत टीका
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली नायब राज्यपालांच्या निवास्थानी सुरू केलेल्या आंदोलनाला एकीकडे विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र आपच्या भूमिकेवर खरमरीत टीका केली आहे. आम आदमी पक्ष म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो,' अशी खरमरीत टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.
दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि अधिकाऱ्यांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या असहकाराविरोधात अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांच्या निवास्थानी सुरू केलेल्या आंदोलनाची नायब राज्यपाल यांनी अद्यापही दखल घेतलेली नाही, त्यामुळे वाद अधिकच चिघळला आहे. मात्र पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उभारणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपा नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी खरमरीत टीका केली आहे. 'आम आदमी पक्ष म्हणजे "करने मे झीरो, धरने मे हिरो'आहे. ''करना कुछ नही धरना सब कुछ"अशी त्यांची मानसिकता आहे,''अशी टीका नक्वी यांनी केली आहे. दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते धुळीस मिळवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
'Karne mein zero, dharne mein hero, Karna kuch nahi dharna sab kuch' This is their mindset, it is destroying the trust people of Delhi had put in them: Mukhtar Abbas Naqvi,Union Minister on AAP protests. pic.twitter.com/jRIdyPYsh0
— ANI (@ANI) June 18, 2018
दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी धरणे आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र. या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. रविवारी सकाळपासून सत्येंद्र जैन यांची तब्येत खालवली होती. तपासणी केली त्यावेळी त्यांचे वजन 78.5 किलो असल्याची नोंद होती. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विटवरुन दिली आहे.