'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:50 PM2023-08-09T16:50:48+5:302023-08-09T16:53:44+5:30

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले.

aap member sushil gupta wearing garland of tomatoes rs chairman objects | 'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले...

'आप'चे खासदार टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले; सभापती म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली : देशाच्या संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. पण संसदेत खासदार आपला निषेध व्यक्त करण्यासाठी अनोखे मार्ग अवलंबतात. असाच काहीसा प्रकार बुधवारी संसदेतही पाहायला मिळाला. दिल्लीत टोमॅटोचे भाव २०० रुपये किलोवर पोहोचला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार सुशील गुप्ता टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत पोहोचले.

केंद्रीय मंत्र्यांना टोमॅटो आणि आले भेट देणार आहे, असे खासदार सुशील गुप्ता यांनी सांगितले. तसेच, देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडत असल्याचे सुशील गुप्ता यांनी सभागृहाबाहेर सांगितले. सर्वसामान्य माणूस महागाईच्या आगीत होरपळत आहे, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. टोमॅटोशिवाय डिझेल-पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. असे असतानाही सरकार ना महागाईवर चर्चा करत आहे, ना मणिपूरवर चर्चा करत आहे. त्यामुळे हा दागिना (टोमॅटोची हार) घालून सभागृहात जात आहे, असे खासदार सुशील गुप्ता म्हणाले.

दरम्यान, सभागृहात सुशील गुप्ता यांच्या शेजारी बसलेले जेडीयू खासदार अनिल प्रसाद हेगडे यांना बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा सुशील गुप्ताही कॅमेऱ्यात दिसले. यावेळी त्यांनी गळ्यात घातलेला टोमॅटोचा माळ उचलला आणि राज्यसभेच्या कॅमेऱ्यातही दाखवला. राज्यसभेत सुशील गुप्ता जेव्हा टोमॅटोचा हार दाखवत होते, तेव्हा आपचे खासदार राघव चढ्ढाही पुढच्या रांगेत बसले होते.

पीयूष गोयल यांना भेट देणार टोमॅटो
खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती पाहता सुशील गुप्ता यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे वेळ मागितली आहे. पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर त्यांना टोमॅटो आणि आल्याची टोपली भेट देणार असल्याचे सुशील गुप्ता म्हणाले. तसेच, मणिपूर, हरयाणा, महागाईवर सरकारने घरात चर्चा करावी, मात्र सरकार सभागृहातील चर्चेपासून पळ काढत असल्याचेही सुशील गुप्ता म्हणाले.

सभापतींनी नोंदवला आक्षेप 
दुसरीकडे, राज्यसभेच्या सभापती जगदीप धनखड यांनी आप खासदार सुशील गुप्ता यांनी टोमॅटोचा हार घालून राज्यसभेत येण्यावर आक्षेप नोंदवला. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, सभागृहात वागण्याची मर्यादा असते आणि ठराविक प्रोटोकॉल असतो. राज्यसभेचे अध्यक्ष असताना आमच्या सभागृहातील अनेक सन्माननीय सदस्य या मर्यादेचे उल्लंघन करतात, हे पाहून मला दुःख झाले आहे, असे सभापती जगदीप धनखड म्हणाले.  यानंतर त्यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.

Web Title: aap member sushil gupta wearing garland of tomatoes rs chairman objects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.