अस्तित्वात नसलेले मंत्रालय चालवते होते आपचे मंत्री; पंजाब सरकारला २० महिन्यांनी आली जाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:33 IST2025-02-22T14:23:57+5:302025-02-22T14:33:08+5:30
पंजाबमध्ये आपचे एक मंत्री अस्तित्वात नसलेल्या खात्याचे काम पाहात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अस्तित्वात नसलेले मंत्रालय चालवते होते आपचे मंत्री; पंजाब सरकारला २० महिन्यांनी आली जाग
Punjab AAP Kuldeep Singh Dhaliwal: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारबाबत एक अजब प्रकार समोर आला आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार त्यांच्या एका मंत्र्यामुळे चांगलेच अडचणीत आलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यशैलीवर टीका केली जात आहे. भगवंत मान यांच्या पंजाब सरकारला त्यांच्या एका मंत्र्यांकडे असं खातं होतं जे अस्तित्वात नाही हे समजायला २० महिने लागल्याचे समोर आलं आहे. पंजाब सरकारने आता या मंत्र्यांशी संबंधित अधिसूचना जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे.
पंजाब सरकारमधील राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल हे गेल्या २० महिन्यांपासून एक विभाग चालवत होते जे सरकारी कागदपत्रांमध्ये नव्हते. मंत्री कुलदीपसिंग धालीवाल यांना प्रशासकीय सुधारणा विभाग सोपवण्यात आला होता, पण आता सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे की असा कोणताही विभाग अस्तित्वात नव्हता. या सगळ्या प्रकारावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने या मुद्द्यावरून आप सरकारला धारेवर धरलं आहे.
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल आता फक्त अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. धालीवाल, अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री या नात्याने अमृतसरमध्ये अमेरिकेतून परत आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न हाताळताना दिसले तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. मात्र २० महिने मंत्री धारीवाल हे कोणत्या खात्याच्या नावावर निर्णय घेत राहिले, असा सवाल विरोधकांनी केलाय.
राज्यपालांनी जारी केलेल्या नवीन आदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शिफारशीनुसार धालीवाल यांचे मंत्रालय ७ फेब्रुवारी २०२५ पासून बदलण्यात आल्याचे म्हटलं आहे. यापूर्वी त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण खातेही होते. मे २०२३ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यानंतर त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना एनआरआय प्रकरणांसह प्रशासकीय सुधारणा खाते देण्यात आले, जे आता अस्तित्वातच नसल्याचे समोर आलं आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, या विभागाच्या नावाने एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता तसेच त्याची कधी बैठकही झाली नाही. मुख्यमंत्री भगवंत मान, अर्थमंत्री हरपाल चीमा, अक्षय ऊर्जा मंत्री अमन अरोरा आणि सामाजिक न्याय मंत्री डॉ. बलजीत कौर यांच्यानंतर धालीवाल हे पंजाब सरकारचे पाचवे ज्येष्ठ मंत्री आहेत. २० महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांना माहितही नव्हते की, आपले मंत्री एक असा विभाग चालवत आहेत जो अस्तित्वात नाही. त्यामुळे पंजाब सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.