विभागातील समस्या सांगितल्याने आमदार महोदय भडकले; रागात व्यक्तीच्या डोक्यात घातली वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:25 PM2022-07-07T17:25:47+5:302022-07-07T17:28:32+5:30
दिल्लीतील मॉडल टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एका आमदारावर गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील मॉडल टाउन मतदारसंघाचे आम आदमी पार्टीच्या आमदारांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने आप आमदारावर आरोप केला आहे की, आमदाराने त्याच्यावर विटांनी हल्ला केला आहे. अशोक विहार स्टेशनमधील पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मॉडल टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. सदर विभागातील रहिवाशी असलेल्या गुड्डू हलवाई नावाच्या व्यक्तीने आरोप करताना म्हटले की, आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांच्याद्वारे मला मारहाण करण्यात आली, माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. यावरून स्थानिक पोलिसांनी आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आमदार अखिलेश पती त्रिपाठी यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हा सगळा राजकीय डाव असल्याचे म्हटले आहे. मी कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जखमी व्यक्ती रूग्णालयात दाखल
दिल्ली पोलिसांनी एका मेसेजद्वारे या घटनेची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी जवळपास ४.३० च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे एक जखमी व्यक्ती गुड्डू हलवाई आणि एक मुकेश बाबू नावाची व्यक्ती होती, ज्यांना पोलिसांनी जगजीवन राम या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
विटांच्या तुकड्यांनी केला हल्ला
जखमी व्यक्तीने म्हटले की, जेलरवाला बागजवळ तो केटरिंगचे काम करत असताना स्थानिक आमदार अखिलेश पती त्रिपाठीला भेटला आणि त्याने गटाराच्या समस्येबाबत तक्रार केली. यामुळे आमदार महोदयांचा राग अनावर झाला आणि त्याच्यावर विटांच्या तुकड्यांनी हल्ला केला. या दरम्यान बचावाला आलेले गुड्डूचे नातेवाईक महेश बाबू हेदेखील जखमी झाले असून त्यांनी आमदारावर गंभीर आरोप केले. तसेच गुड्डूच्या हाताला, डोक्याला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ आणि ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.