‘आप’ आमदार अमानतुल्लाह खान हिस्ट्रीशीटर घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:39 AM2022-05-14T07:39:06+5:302022-05-14T07:39:28+5:30
जामिनावर सुटका : दहा वर्षांत आप नेत्यांवर २०० हून अधिक गुन्हे
- शरद गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतील ओखलामधील आमदार अमानतुल्लाह खान यांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी हिस्ट्रीशीटर घोषित केले. मदनपूर खादर भागात बुलडोझरने अतिक्रमण हटविण्याला ते विरोध करत होते. त्यांच्याविरुद्ध १८ गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, न्यायालयाने अमानतुल्लाह खान यांची शुक्रवारी जामिनावर सुटका केली. त्यांचे वकील मोहम्मद इरशाद यांचे म्हणणे आहे की, तीनही प्रकरणांत जामीन मिळू शकतो. अन्य १५ प्रकरणे न्यायालयाकडून यापूर्वीच फेटाळण्यात आले आहेत. हिस्ट्रीशीटर घोषित करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊ.
२०१३ मध्ये प्रथम ‘आप’चे सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत पक्षाच्या आमदारांविरुद्ध २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील ७२ प्रकरणांत तथ्य न आढळल्याने न्यायालयाने ही प्रकरणे फेटाळली, तर ४८ प्रकरणे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. उर्वरित प्रकरणांत न्यायालयाने स्थगिती दिली आहे अथवा आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली, मुंबई, बंगळुरु, गुवाहाटी आणि उत्तर प्रदेशात एकूण ३० पेक्षा अधिक प्रकरणे दाखल आहेत. यातील १२ गुन्हेगारी स्वरूपाचे, मानहानीचे होते. यातील चार प्रकरणांत त्यांची निर्दोष सुटका झाली, तर चार प्रकरणांत त्यांनी माफी मागितली. २०१४ मध्ये राजभवनासमोर धरणे आंदोलन, दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण ही प्रकरणे प्रलंबित आहेत.
आपच्या अनेक नेत्यांवर दाखल आहेत गुन्हे
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध १२ गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. आपचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन, गोपाल राय आणि कैलाश गहलोत यांच्याविरुद्धही दंगल आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान ही प्रकरणे प्रलंबित आहेत.
‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह सांगतात की, आपल्याविरुद्ध आतापर्यंत पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ५० पेक्षा अधिक प्रकरणे दाखल आहेत. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अशाप्रकारे बनावट प्रकरणे दाखल करून आपच्या नेत्यांचा सामाजिक संकल्प आणखी मजबूत होत आहे.