आम आदमी? उमेदवारी अर्ज भरायला स्कूटरवरून, आमदार होताच फिरताहेत २ कोटींच्या कारमधून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:06 PM2022-05-04T19:06:04+5:302022-05-04T19:06:34+5:30
तीन महिन्यांत कायापालट? स्कूटरवरून येऊन उमेदवारी अर्ज भरला; आमदार होताच २ कोटींच्या कारमधून फिरताहेत
चंदिगढ: आम आदमी पक्षानं दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही सत्ता मिळवली. पंजाबवासीयांनी काँग्रेसला नाकारत आपला भरभरुन मतदान केलं. आपच्या झाडूनं दिग्गजांची सफाई केली. आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पराभव पत्करावा लागला. अरविंद केजरीवालांचं दिल्ली मॉडेल पाहून पंजाबी जनतेनं आपला मतदान केलं. त्यासोबतच केजरीवालांच्या साध्या राहणीचादेखील आपच्या विजयात मोठा वाटा आहे. मात्र आपच्या एका आमदाराचं राहणीमान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पश्चिम लुधियानाचे आमदार गुरप्रीत गोगी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गोगी बुधवारी पिवळ्या रंगाची पोर्श कार घेऊन कार्यालयात पोहोचले. या कारची किंमत दीड कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांची कार पाहून सारेच चकित झाले. यावरून आता विरोधकांनी आपवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना गोगी स्कूटरवरून गेले होते. तेव्हा त्यांची बरीच चर्चा झाली होती.
गोगी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पिवळ्या रंगाची पॉर्श कार कार्यालयाबाहेर उभी असलेली दिसत आहे. ती कार एक व्यक्ती साफ करत आहे. आमदार गोगी कार्यालयातून बाहेर पडून स्टाईलमध्ये कारमध्ये बसत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. गोगी बसताच कारचं रुफ टॉप मागे जातं. त्यातून गोगी निघून जातात. याबद्दल गोगींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ही कार मुलाची असल्याचं गोगींनी सांगितलं.
आम आदमी पक्षाच्या आमदाराकडे असलेली खास कार पाहून विरोधकांनी निशाणा साधला. युवक भाजपचे राष्ट्रीय सचिव तेंजेंद्र सिंह बग्गा यांनी गोगींचा व्हिडीओ ट्विट केला. 'आता आम आदमी करोडोंची कारही चालवू शकत नाही का?,' असा खोचक सवाल बग्गा यांनी उपस्थित केला.