AAP MLA : 90 किमी सायकल प्रवास करत शपथविधीला आले आमदार, पगार म्हणूनही केवळ 1 रुपयाच 'मान'धन घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 09:34 PM2022-03-17T21:34:48+5:302022-03-17T21:37:00+5:30

देव मान हे गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते

AAP MLA : The MLA, who reached the swearing in ceremony after traveling 90 km by bicycle, will also take only Rs | AAP MLA : 90 किमी सायकल प्रवास करत शपथविधीला आले आमदार, पगार म्हणूनही केवळ 1 रुपयाच 'मान'धन घेणार

AAP MLA : 90 किमी सायकल प्रवास करत शपथविधीला आले आमदार, पगार म्हणूनही केवळ 1 रुपयाच 'मान'धन घेणार

Next

पटियाला - नाभा येथील आम आदमी पक्षाचे आमदार गुरदेव सिंह देव मान यांनी पंजाब विधानसभेच्या शपथग्रहण समारोहात सहभागी होण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. ते नाभा ते चंडीगड असा तब्बल 90 किमीचा सायकल प्रवास करून शपथविधी सोहळ्याला हजर झाले. विधानसभा हलका येथून शपथग्रहण समारोहाच्या स्थळावर पोहोचण्यासाठी स्वत: सायकल चालवून 90 किमी प्रवास करणारे हे एकमेव आमदार असतील. सध्या गुरदेव सिंह यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

देव मान हे गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते. मात्र, काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण, यंदा त्याच काँग्रेस उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करत ते आपचे आमदार बनले आहेत. विशेष म्हणजे विजयानंतरही त्यांनी घोषणा केली होती, की नाभा मतदारसंघात आपण सायकलवर फिरुनच लोकांच्या समस्या जाणून घेणार. सायकलवरुन फिरल्याने लोकं कुठेही आपणास भेटू शकतील, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच, केवळ महिना 1 रुपये मानधन स्वरुपात पगार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. 

आमदार गुरदेव सिंह यांनी मंगळवारी एका रस्त्यावरील लाईट नीट करण्यासाठी स्वत: कसरत केली. क्रेनवर चढून त्यांनी गोशाला रस्त्यावरी ही स्ट्रीट लाईट दुरूस्त केली. गेल्या 1 वर्षांपासून ही स्ट्रीट लाईट बंद होती. मात्र, आमदार गुरदेव यांनी ती चालू करून घेतली. दरम्यान, आपण सुरक्षा आणि सरकारी कारही वापरणार नसल्याचे मान यांनी जाहीर केले आहे. 

शपथविधीचा भव्य सोहळा

भगवंत मान यांचा हा भव्य शपथविधी सोहळा 100 एकराच्या परिसरात झाला. यातील 44 एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला सुमारे 3 ते 4 लाख लोक उपस्थित होते. या सोहळ्यात 50 हजार लोकांच्या बसण्याची सोय केली होती, तर उर्वरित ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार होते. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.

पंजाब निवडणुकीत 'आप'ने 92 जागा जिंकल्या 
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.

Web Title: AAP MLA : The MLA, who reached the swearing in ceremony after traveling 90 km by bicycle, will also take only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.