"नमस्कार! मी निलंबित खासदार राघव चढ्ढा...", 'आप' नेत्याची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 07:11 PM2023-08-11T19:11:36+5:302023-08-11T19:19:49+5:30
राघव चढ्ढा यांनी राज्यसभा सभागृहातून निलंबनानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी बनावट सह्यांच्या प्रकरणात राज्यसभेने निलंबित केले आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहातील त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राघव चढ्ढा यांनी राज्यसभा सभागृहातून निलंबनानंतर भाजपवर निशाणा साधला आहे.
राघव चढ्ढा यांनी एक व्हिडीओ शेअर करत माझा गुन्हा काय आहे, ज्यामुळे मला निलंबित करण्यात आले? असा सवाल केला आहे. राघव चढ्ढा म्हणाले, "नमस्कार! मी निलंबित खासदार राघव चढ्ढा आहे... मला आज राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. माझा गुन्हा काय आहे? हे मला जाणून घ्यायचे आहे. मी जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्यांना संसदेत उभे राहून प्रश्न विचारले, हा माझा गुन्हा आहे का?"
राघव चढ्ढा पुढे म्हणाले, "दिल्ली सेवा विधेयकावर माझा मुद्दा ठेवून मी भाजपच्या मोठ्या नेत्यांकडे न्याय मागितला, हा माझा गुन्हा आहे का? त्यांना त्यांचा जुना जाहीरनामा दाखवून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले. भाजपला आरसा दाखवला आणि आजची भाजप कशी अडवाणीवादी आणि वाजपेयीवादी असल्याचे सांगितले. त्यांना भीती वाटते की ३४ वर्षांचा तरुण संसदेत उभा राहून आम्हाला कसे आव्हान देतो?"
My statement on suspension from Rajya Sabha
— Raghav Chadha (@raghav_chadha) August 11, 2023
राज्य सभा से निलंबित होने पर मेरी प्रतिक्रिया pic.twitter.com/0jM3DS6M7I
"मी आव्हानांना घाबरत नाही"
"हे लोक खूप शक्तिशाली आहेत, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. या आठवड्यात मला विशेषाधिकार समितीकडून दोन नोटिसा मिळाल्या आहेत. कदाचित हे देखील स्वतःचे रेकॉर्ड असेल. विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही. विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद करण्यात आला. या पावसाळी अधिवेशनात आपच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यांना कोणीही प्रश्न विचारू नये, कोणी आवाज उठवू नये, प्रत्येक व्यक्तीला निलंबित करावे, अशी या लोकांना इच्छा आहे. पण, मी भाजपच्या जनतेला सांगू इच्छितो की, तुमच्या या आव्हानांना मी घाबरत नाही, मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत लढत राहीन", अशा शब्दांत राघव चढ्ढा यांनी भाजपवर निशाणा साधला.