बलात्काराच्या धमक्या येत आहेत- ‘आप’ खासदार स्वाती मालीवाल यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:00 PM2024-05-27T14:00:44+5:302024-05-27T14:01:18+5:30
ध्रुव राठीलादेखील धरले जबाबदार, कारण काय, वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल आणि पक्षातील नेत्यांमध्ये वाद आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर आता पक्षातील लोकांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणावर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या यु-ट्यूबर ध्रुव राठीलादेखील जबाबदार धरले आहे.
रविवारी स्वाती मालीवाल यांनी एक्सवर पोस्ट केली की, “आपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी चारित्र्यहनन मोहीम सुरू केल्यानंतर आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकावले जात आहे. यु-ट्यूबर ध्रुव राठीने माझ्याविरोधात एकतर्फी व्हिडीओ पोस्ट केल्यावर यात आणखी वाढ झाली आहे. माझी बाजू मांडण्यासाठी मी ध्रुव राठीला फोन केला; पण त्याने दुर्लक्ष केले. त्याच्यासारख्या स्वतंत्र पत्रकाराने ‘ आप’च्या इतर प्रवक्त्यांसारखे वागणे लज्जास्पद आहे.
हे मुद्दे मांडले...
ध्रुव राठीच्या व्हिडीओबाबत आपले मत मांडताना मालीवाल यांनी काही मुद्दे मांडले. घटना मान्य करून पक्षाने यू-टर्न घेतला. एमएलसी अहवालात हल्ल्यामुळे झालेल्या जखमा, व्हिडीओचा एक भाग प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आरोपीने फोन केला.
आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी त्याला पुन्हा तिथे का जाऊ दिले? जी महिला नेहमी योग्य मुद्द्यांसाठी उभी राहिली, अगदी सुरक्षेशिवाय एकटी मणिपूरला गेली, तिला भाजप कसे विकत घेईल?, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
मला काही झाले तर...
मालीवाल पुढे म्हणाल्या, ‘आप आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा ज्या प्रकारे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावरून महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट होते. मी दिल्ली पोलिसांकडे बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांची तक्रार करत आहे. गुन्हेगारांवर ते कठोर कारवाई करतील, अशी आशा आहे. मला काही झाले तर ते कोणाच्या सांगण्यावरून घडेल, हे आता आम्हाला माहीत आहे,’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.