"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 01:51 PM2024-11-28T13:51:37+5:302024-11-28T13:52:06+5:30
Arvind Kejriwal : केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
नवी दिल्ली : दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुरुवारी (दि.२८) म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी एक नकाशा दाखवला. ज्यामध्ये अमित शाहांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर परिसरात अलीकडच्या काळात किती गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, हे नकाशाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला.
आज मला जड अंतःकरणाने ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुंबईसारखे गँगवार दिसत आहे. आज दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी आहे. गेल्या तीन महिन्यांत यमुनेच्या पलीकडे झालेल्या गँगवॉरमध्ये २० जणांना आपला जीव गमवावा लागला, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, दहा वर्षांपूर्वी मला एक जिम्मेदारी मिळाली. त्यावेळी शाळा, वीज, आरोग्य, पाणी या सर्व गोष्टी मी व्यवस्थित केल्या. पाण्याची स्थिती सुधारत आहे. मात्र, दिल्लीतील सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अमित शाह यांची आहे. अमित शाह दहा वर्षात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरले आहेत. दिल्लीला रेप कॅपिटल, गँगस्टर कॅपिटल म्हटले जात आहे. आज महिला आणि व्यावसायिक सर्वाधिक घाबरले आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, काल मी एका व्यावसायिकाला भेटायला नांगलोईला गेलो होतो, ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मी फक्त भेटायला गेलो होतो, पण भाजपचे खासदार आपल्या लोकांसह तिथे पोहोचले आणि मला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, मला रोखून काही होणार नाही.
#WATCH दिल्ली: AAP के राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ने कहा, "कल मैं नांगलोई गया। नांगलोई में रौशन लाल नाम के एक व्यक्ति जो दुकान चलाते हैं उन पर गोली चलाई गई। कल मैं उनसे मिलने के लिए गया था, भाजपा के कार्यकर्ताओं ने मुझे उनके दुकान तक नहीं जाने दिया। बाद उन्होंने अपने बेटे को… pic.twitter.com/fUtI2amunz
— ANI_HindiNews (@AHindinews) November 28, 2024
पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या एका वर्षात १६० खंडणीचे कॉल आले आहेत. तसेच, असे कितीतरी कॉल असतील, जे लोक सांगत नाहीत. एका व्यावसायिकाला परदेशी नंबरवरून खंडणीचा कॉल येतो आणि त्याने पैसे दिले नाही तर त्याला गोळ्या घातल्या जातील असे सांगितले जाते, जेणेकरून व्यावसायिकाने भीतीपोटी पैसे द्यावे. आज दिल्लीत व्यवसाय करणे हा गुन्हा ठरत आहे. या सर्व घटना अमित शाह यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर घडत आहे. जर अमित शहा आपल्या घराची २० किमीचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केली.