विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:54 AM2024-11-20T11:54:17+5:302024-11-20T11:55:35+5:30
Arvind Kejriwal : आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
Arvind Kejriwal : नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या देशातील दोन राज्यांमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अशातच आता केंद्रशासित प्रदेश आणि देशाची राजधानी दिल्लीतही निवडणुकीची धूम सुरू झाली आहे. आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
यादरम्यान आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष कोणाला तिकीट देण्याचा विचार करत आहे, याबाबत खुलासा केला आहे. आप उमेदवारांना त्यांचे काम, विजयाची शक्यता आणि जनमताच्या आधारे तिकीट देईल, असे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सांगितले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी कोणत्याही नातेवाईक, ओळखीच्या किंवा मित्राला तिकीट देणार नाही. कोणतीही घराणेशाही होणार नाही. मी उमेदवारांचे मूल्यमापन त्यांचे काम, जिंकण्याची शक्यता आणि लोकांचे मत, या आधारावर मूल्यमापन करेन".
पक्षाला देवाचा आणि जनतेचा आशीर्वाद - केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उत्तर-पश्चिम आणि पश्चिम दिल्लीतील पक्ष कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप नक्कीच जिंकेल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी दावा केला. तसेच, आपने सत्याचा मार्ग अवलंबला असून पक्षाला देवाचा आणि जनतेचा आशीर्वाद आहे, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुका कधी होणार?
निवडणुकीच्या तयारीबाबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, केजरीवाल प्रत्येक जागेवर निवडणूक लढवत आहेत हे लक्षात ठेवा. तसेच, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांना केजरीवाल यांनी धार्मिक युद्ध म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीत विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.