AAP नेते दुर्गेश पाठक यांना ईडीचे समन्स, केजरीवालांच्या स्वीय सचिवाचीही चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:51 PM2024-04-08T13:51:01+5:302024-04-08T14:02:21+5:30
Delhi Liquor Policy : ईडीकडून दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आम आदमी पक्षाचे (आप) नेते दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवले आहे. तसेच, या प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिवाचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.
दुर्गेश पाठक यांना येत्या दोन महिन्यांत अटक केली जाईल, असा दावा दोन दिवसांपूर्वी आप नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी केला होता. तसेच, त्या म्हणाल्या होत्या की, मला भाजपामध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. भाजपामध्ये सामील झाले नाही, तर येत्या काही दिवसांत मला अटक केली जाईल, असाही दावा त्यांनी केला होता. यानंतर आता ईडीकडून दुर्गेश पाठक यांना समन्स पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
The Enforcement Directorate is currently questioning Delhi Chief Minister Arvind Kejriwal's personal assistant Bibhav Kumar while AAP MLA Durgesh Pathak has also been summoned today in the Delhi excise policy probe: Sources
— ANI (@ANI) April 8, 2024
याचबरोबर, राघव चड्ढा, सौरभ भारद्वाज यांनाही येत्या दोन महिन्यांत अटक करण्याचा भाजपाचा मानस असल्याचा दावा आतिशी यांनी होता. मात्र, यावर भाजपाने पलटवार करत आतिशी यांनी ऑफर देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड करावे, असे म्हटले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
आपकडून निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. आप आजपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहे. अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहे. आज आप दिल्लीत प्रचाराची सुरुवात करणार आहे, तर आतिशीआजपासून तीन दिवस आसाममध्ये प्रचार करणार आहेत. आतिशी या दिब्रुगड आणि सोनितपूर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. निवडणूक रॅलींसोबतच त्या आसाममधील दुलियाजानमध्ये रोड शोही करणार आहे. या जागांसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.