'आप'च्या दोन आमदारांवर अटकेची टांगती तलवार
By Admin | Published: September 12, 2016 02:14 PM2016-09-12T14:14:21+5:302016-09-12T14:14:21+5:30
आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आपच्या आणखी दोन आमदारांना पोलिस अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.12- आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आपच्या आणखी दोन आमदारांना पोलिस अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओखला येथील आमदार अमानतुल्लाहविरोधात छेडछाडीच्या आरोपामुळे एफआयआर दाखल कऱण्यात आली आहे. तसेच, मालवीय नगरचे आमदार सोमनाथ भारती यांच्याविरोधातही 'एम्स'च्या संपत्तीला नुकसान पोहोचवल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गळ्याच्या सर्जरीसाठी बंगळुरूला जाणार आहेत. केजरीवालांच्या अनुपस्थितीत दोन्ही आमदारांना अटक होण्याची शक्यता आहे
पेन ड्राइव्हमध्ये आहेत पुरावे?
ओखलाचे आमदार अमानतुल्लाहविरोधात त्यांच्या मेव्हण्याच्या पत्नीने छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने जामिया नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपानंतर अमानतुल्लाह यांनी पक्षाकडे राजीनामा दिला होता मात्र हे प्रकरण त्यांच्या कुटुंबाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी त्यांचा राजीनामा स्विकारायला नकार दिला.
अमानतुल्लाहविरोधातील भक्कम पुरावे आपल्याकडे असून , पुरावे असलेला पेन ड्राइव्ह पोलिसांना देणार असल्याचं तक्रारदार महिलेने सांगितलं.
गेल्या दीड वर्षांपासून अमानतुल्ला त्रास देत असून यामध्ये स्वतःचा पतीदेखील अमानतुल्लाची साथ देतो अशी तक्रार या महिलेने केली आहे. पोलिसांनी अमानतुल्लाविरोधात आयपीसी कलम 354, 506, 509, 498ए आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.