‘आप’च्या मंत्र्यांचे ‘पदवी’पत्र बनावट

By admin | Published: April 29, 2015 12:06 AM2015-04-29T00:06:35+5:302015-04-29T00:06:35+5:30

आम आदमी पार्टीचे (आप)आमदार आणि दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी केजरीवालांविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला आहे.

AAP's ministerial post | ‘आप’च्या मंत्र्यांचे ‘पदवी’पत्र बनावट

‘आप’च्या मंत्र्यांचे ‘पदवी’पत्र बनावट

Next

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप)आमदार आणि दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी केजरीवालांविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला आहे. केजरीवाल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा व तोमर यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी केली आहे.
दरम्यान, माझे प्रमाणपत्र १०० टक्के खरे असून माझ्यावरील आरोप मला व पक्षाला बदनाम करण्याचे प्रयत्न असल्याचे खुद्द तोमर यांनी म्हटले आहे. पक्षानेही त्यांचा बचाव केला आहे. तोमर २० आॅगस्टला आपले स्पष्टीकरण न्यायालयात सादर करणार आहेत. तोपर्यंत संयम राखण्याची गरज असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
जितेंद्रसिंह तोमर यांचे पदवीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा बिहारातील तिलक मांझी विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयासमक्ष केला आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपने मंगळवारी आम आदमी पार्टी आणि या पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांना जोरदार लक्ष्य केले.



दुसऱ्यांना राजकारणाची नीतिमूल्ये शिकवणाऱ्या आम आदमी पार्टीचा बुरखा या प्रकरणानंतर टराटरा फाटला असल्याची बोचरी टीका भाजपने यानिमित्ताने केली. तोमर यांनी दिलेली पदवी बनावट आहे. कायदामंत्र्यांनी स्वत:च कायदा पायदळी तुडवला. आम आदमी पार्टीचा खरा चेहरा यामुळे लोकांसमोर आला आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना याचे उत्तर द्यावे, असे भाजप प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या.
काँग्रेसने यानिमित्ताने केजरीवालांना लक्ष्य केले. केजरीवाल यांनी खरे काय माहीत असूनही त्यांनी कायदामंत्र्यांना पदावर कायम ठेवले, यामुळे केजरीवालांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तोमर यांचीही मंत्रिपदावरूनच नव्हे, तर आमदारपदावरूनही हकालपट्टी करावी, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी. चाको यांनीही दिल्लीच्या कायदामंत्र्यांची पदवी बनावट असल्याचे उघडकीस येणे केजरीवाल सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले.

काय आहे प्रकरण?
बिहारमधील तिलक मांझी भागलपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्याचा दावा तोमर यांनी केला होता. मात्र निवडणूक अर्जात तोमर यांनी समाविष्ट केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा खुलासा खुद्द तिलक मांझी भागलपूर विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयासमक्ष काल सोमवारी केला होता.
तोमर यांची कायद्याची पदवी बनावट असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने तिलक मांझी, भागलपूर विद्यापीठाला नोटीस जारी केली होती. या नोटीसच्या उत्तरादाखल विद्यापीठाने सोमवारी एक प्रतिज्ञापत्र न्यायालयासमक्ष सादर केले. यात तोमर यांच्या नावाचे अंतरिम प्रमाणपत्र बनावट असल्याचे आणि विद्यापीठात याची कुठलीही नोंद नसल्याचे म्हटले आहे.

कोट
माझी पदवी १०० टक्के खरी आहे. विद्यापीठाच्या रेकॉर्डसोबत छेडछाड करण्यात आली आहे. न्यायालयासमक्ष मी सर्व नोंदी ठेवल्या तेव्हा आपसूकच ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल. माझ्यावरील आरोप हे मला व पक्षाला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.
- जितेंद्रसिंह तोमर, दिल्लीचे कायदामंत्री

Web Title: AAP's ministerial post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.