‘आप’चे पक्ष कार्यालय सील, सर्व नेत्यांना बाहेरच रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 08:23 AM2024-03-24T08:23:26+5:302024-03-24T08:23:50+5:30
कारवाईचा कार्यकर्त्यांकडून निषेध, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) दिल्लीतील कार्यालय सर्व बाजूंनी सील करण्यात आले असून, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल, असे आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांनी शनिवारी सांगितले. आतिशी यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या काळात एका राष्ट्रीय पक्षाचे कार्यालय सील करणे, हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या ‘समान संधी’च्या विरुद्ध आहे. यावर तक्रार करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागत आहोत.
आतिशी यांना पोलिसांनी कार्यालयात जाण्यापासून रोखले असा आरोप आपच्या वतीने करण्यात आला. आतिशी यांनी एक व्हिडीओ एक्सवर टाकला. त्यात आतिशी आणि पोलिस अधिकाऱ्यांत हुज्जत सुरू असल्याचे दिसते. शहीद दिनाचे औचित्य साधून आपने शहीद पार्कवर जोरदार निदर्शने केली. खबरदारीचा उपाय म्हणून मध्य दिल्लीत सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त लावला.
आपचे अन्य एक वरिष्ठ नेते तथा दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही केंद्र सरकारने आपच्या कार्यालयाची सर्व प्रवेशद्वारे बंद केल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घेऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी, असे ते म्हणाले. आपचे दिल्लीतील कार्यालय डीडीयू मार्गावर आहे. याच मार्गावर भाजपचे मुख्यालय आहे. शुक्रवारी आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यालयावर निदर्शने केली होती. तेव्हा पोलिसांनी आपचे कार्यालय बंद केले होते.
अरविंद केजरीवाल यांची चौकशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. चौकशीचे फुटेज सुरक्षित ठेवले जाईल. ते दररोज अर्धा तास आपली पत्नी सुनीता आणि खासगी सचिव यांना भेटू शकतील, त्यांना डॉक्टरांच्या सूचनेनुसार जेवण दिले जाईल, असे आदेशात म्हटले.
जर्मन दूतावासाच्या उपप्रमुखास समज
केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी जर्मनीच्या विदेश मंत्रालयाने अनावश्यक टिप्पणी केल्यामुळे शनिवारी भारतीय विदेश मंत्रालयाने दिल्लीतील जर्मन दूतावासाचे उपप्रमुख जॉर्ज एनजव्हिलर यांना पाचारण करून समज दिली.
भारताच्या न्यायालयीन प्रक्रियेतील हस्तक्षेप तसेच पूर्वग्रहदूषित वक्तव्ये अनपेक्षित असल्याची समज त्यांना देण्यात आली. केजरीवाल यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना जर्मन विदेश मंत्रालयाने म्हटले होते की, न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाही सिद्धांत या प्रकरणातही लागू होतील, अशी आम्हाला आशा आहे.
ईडी पैशांचे व्यवहार सिद्ध करू शकली नाही
आप नेत्या आतिशी यांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाची ईडीने २ वर्षे चौकशी केली. कित्येक छापे मारले. अनेक नेत्यांना अटक केली. मात्र, आतापर्यंत एका पैशाच्या देवघेवीचा पुरावाही ईडी मिळवू शकलेली नाही.
केजरीवाल देशात क्रांती आणतील : मान
आप नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी यांच्यासह अन्य नेत्यांनी शनिवारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त शहीद पार्कला भेट दिली. तेथे मान यांनी सांगितले की, भाजप देशात हुकूमशाही आणू पाहत आहे. पण, केजरीवाल बाहेर येतील आणि मोठी क्रांती आणतील.
पोलिस अधिकाऱ्यास तेथून हटवा
आपल्याला न्यायालयात आणले जात असताना अकारण कठोर व्यवहार करणारे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ए. के. सिंह यांना हटविण्याची
विनंती अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयास एका याचिकेद्वारे केली. त्यावर विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे
आदेश दिले.