विधानसभेसाठी पंजाबमध्ये ‘आप’ची जोरदार मुसंडी
By Admin | Published: February 7, 2016 01:46 AM2016-02-07T01:46:49+5:302016-02-07T01:46:49+5:30
अरविंद केजरीवालांच्या मुख्तसर येथील माघी रॅलीने पंजाबच्या राजकारणात नवे रंग भरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला १0 ते ११ महिने शिल्लक असले तरी ४ वर्षांपूर्वी स्थापन
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
अरविंद केजरीवालांच्या मुख्तसर येथील माघी रॅलीने पंजाबच्या राजकारणात नवे रंग भरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला १0 ते ११ महिने शिल्लक असले तरी ४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘आप’ने आतापासूनच पंजाबचा गड जिंकण्यासाठी मुसंडी मारली आहे. सत्ताधारी अकाली दल, भाजप आणि प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेतील काँग्रेसला ‘आप’ने आक्रमक आव्हान दिले आहे.
दोन मास्टर स्ट्रॅटेजिस्टच्या कौशल्याचा कस या निवडणुकीत पणाला लागणार आहे. अकाली दलाच्या दहा वर्षांच्या सत्तेविरोधातील वातावरणाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदरसिंगांनी निवडणूक रणनीतीची सूत्रे नीतीशकुमार आणि त्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांच्या हाती सोपवली आहेत. ‘आप’ची रणनीती दुर्गेश पाठक ठरवीत आहेत. दुर्गेश पाठक अलाहाबादचे आहेत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत २0१४ साली केजरीवालांनी १0 मतदारसंघांची जबाबदारी पाठकांकडे सोपवली होती, त्यापैकी ७ जागा ‘आप’ने जिंकल्या. त्यानंतर २0१५ साली दिल्लीच्या ३५ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असलेल्या पाठक यांनी ३४ जागांवर विजय मिळवून दाखवला. वाराणसी मतदारसंघात केजरीवालांच्या लोकसभा निवडणुकीची सूत्रेही त्यांच्याकडेच होती.
महत्त्वाकांक्षा वाढली
पंजाबच्या ७0 लाख कुटुंबांसह ‘आप’ च्या हितचिंतकांना ‘आप’ला शक्य तितकीच मदत करा, पक्षाचे सदस्य होण्याची बळजबरी नाही, उमेदवारांना मदतनिधी म्हणून १ रुपया, ५ किंवा १0 रुपये दिलेत तरी स्वीकारले जातील, असे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत ४ खासदार निवडून आल्याने सत्तेवर येण्याची महत्त्वाकांक्षा ‘आप’ने बाळगली आहे.