Video: तेव्हा मोदी म्हणाले होते, लाकडात जीव असतो; आम्ही लाकडं कापू शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:03 PM2019-10-08T13:03:22+5:302019-10-08T13:05:35+5:30
मेट्रो कारशेडचा मुद्दा पेटल्यावर व्हिडीओ व्हायरल
मुंबई: आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा मुद्दा सध्या पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं वृक्षतोडीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्यानंतर भररात्री आरेतील झाडं तोडण्यात आली. स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर राज्य सरकारनं वृक्ष तोडण्यासाठी दाखवलेली कार्यक्षमता चर्चेत आली. सरकारला झाडं तोडण्याची इतकी घाई का, असा सवाल सोशल मीडियातून विचारला जाऊ लागला.
राज्यातील भाजपा सरकार आरेतील झाडं तोडण्यासाठी तप्तरता दाखवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदी लाकडाचं महत्त्व आणि पावित्र्य सांगताना दिसत आहेत. ऑगस्टमध्ये डिस्कव्हरी वाहिनीच्या मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत बोलताना लाकडं आणि वनसंपदेवर भाष्य केलं होतं.
'तेव्हा उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावं लागायचं. तेव्हा माझे काका विचार करत होते. चूल पेटवण्यासाठी जे लाकूड कामी येतं, त्या लाकडाचा व्यापार करू. त्यांनी दुकानासाठी जागा घेतली. त्यांनी ही गोष्ट आजीला सांगितली. आजीनं त्यांना रोखलं. ती नाही म्हणाली. उपाशी मरू, मजुरी करू. पण लाकडं विकायची नाहीत. कारण लाकडात जीव असतो. त्यामुळे आपण लाकडं कापू शकत नाही. त्यामुळे माझ्या आजीनं काकांना ते काम करू दिलं नाही. कारण आमच्यावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार आहेत', असं मोदींनी मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये बेअर ग्रिल्ससोबत संवाद साधताना म्हटलं होतं.