अरे व्वा! HR ची चांगली नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय; दरमहा 40 लाखांची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:52 PM2023-11-30T17:52:20+5:302023-11-30T18:01:02+5:30
तरुणाने मल्टीनॅशनल कंपनीतील एचआरची नोकरी सोडून 2015 मध्ये हरितिमा फूड नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला.
दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजित केला जात आहे. यामध्ये देश-विदेशातून अनेक लोक आले आहेत ज्यांनी आपल्या स्टार्टअपमध्ये यश मिळवलं आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या अरेन रत्नेश सोरठिया याचाही समावेश आहे. या तरुणाने मल्टीनॅशनल कंपनीतील एचआरची नोकरी सोडून 2015 मध्ये हरितिमा फूड नावाचा नवीन व्यवसाय सुरू केला.
कठोर परिश्रम आणि जिद्दीने त्याने आपला चहा देशभर वितरीत केला आहे आणि आता दरवर्षी कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. अरेन रत्नेश सोरठियाने सांगितलं की, चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो मल्टीनॅशनल कंपनीत एचआर म्हणून काम करत होता, परंतु त्याला कामाचा आनंद मिळत नव्हता.
"मला चहा खूप आवडतो. नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा विचार मनात आला. मग मी दार्जिलिंगला जाऊन चहावरच शिक्षण घेतलं आणि त्यानंतर हरितिमा फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत माझा स्टार्टअप सुरू केला आणि आज आम्ही लोकांना साधा चहा नाही तर फ्लेवरवाला चहा आणि कॉफी देत आहोत."
17 फ्लेवर्सचा चहा
"आम्ही आमचा व्यवसाय फक्त एका उत्पादनाने सुरू केला. आज आमच्याकडे एकूण 66 उत्पादनं आहेत. आमच्या चहामध्ये रोझ, मसाला, लेमन यासह 17 फ्लेवर्स आहेत. तर कॉफीमध्ये देखील 10 पेक्षा जास्त फ्लेवर्स आहेत. आज आम्ही भारतातील सर्व राज्यांमध्ये आमची उत्पादनं विकतो."
दरमहा 30-40 लाखांची उलाढाल
"सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊनमुळे चहाचं एक पाकीटही विकलं गेलं नाही, पण कोरोना संपताच आमची चहाची विक्री वाढली आणि आज आम्ही आमचा चहा आणि कॉफी 10,000 हून अधिक कॅफेमध्ये विकतो. आमचे 30 ते 40 लाख रुपये वर्षाला फक्त पगार देण्यावरच खर्च होतात. तर महिन्याची उलाढाल 30 ते 40 लाख रुपये आहे" असंही अरेनने म्हटलं आहे. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.