आरती करणारे मुस्लीम समाजाबाहेर, अल्लाखेरीज अन्य कोणी देव नाही, देवबंदचा अजब फतवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:48 AM2017-10-22T00:48:49+5:302017-10-22T00:49:01+5:30
सांप्रदायिक सलोख्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येस वाराणसीत प्रभू रामचंद्रांची आरती करण्याचे काही मुस्लीम महिलांचे कृत्य इस्लामविरोधी आहे व असे करणारी व्यक्ती मुस्लीम समाजात राहू शकत नाही, असा फतवा दारुल उलूम या येथील प्रभावी इस्लामी धर्मिक पाठशाळेने काढला आहे.
देवबंद (उत्तर प्रदेश) : सांप्रदायिक सलोख्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येस वाराणसीत प्रभू रामचंद्रांची आरती करण्याचे काही मुस्लीम महिलांचे कृत्य इस्लामविरोधी आहे व असे करणारी व्यक्ती मुस्लीम समाजात राहू शकत नाही, असा फतवा दारुल उलूम या येथील प्रभावी इस्लामी धर्मिक पाठशाळेने काढला आहे.
दारुल उलूमच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, इस्लाम हा एकेश्वरी धर्म असून तो फक्त सर्वशक्तिमान अल्लालाच ईश्वर मानतो. त्यामुळे अल्लाखेरीज इतर कोणाचीही पूजाअर्चा करणारी व्यक्ती ‘मुस्लीम उलेमा’त राहू शकत नाही. वाराणसीमध्ये मुस्लिमांद्वारे रामाची आरती करण्याचा कार्यक्रम मुस्लीम महिला फाउंडेशन व विशाल भारत संस्थानने आयोजित केला होता.
आरतीनंतर यामागची भावना स्पष्ट करताना त्या भाविक गटाच्या नेत्या नसरीन अन्सारी यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्र हा आमचाही पूर्वज आहे. नाव किंवा धर्म बदलला तरी पूर्वज थोडेच बदलतात? रामाची स्तुती केल्याने हिंदू व मुस्लीम यांच्यातील मानसिक दरी दूर होते. एवढेच नव्हे तर त्यातून इस्लामचे औदार्यही प्रकट होते. (वृत्तसंस्था)
>दारुल उलूमचे एकापाठोपाठ एक फतवे
दारुल उलूमने गेल्या आठवड्यात विविध विषयांवर फतवे काढले आहेत. मुस्लीम स्त्री-पुरुषांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटो समाज माध्यमांत प्रसिद्ध करू नये. महिलांनी भुवया कोरणे, डोक्यावरचे केस कापणे किंवा अन्य प्रकारे केशशृंगार करणे इस्लामविरोधी असल्याचा फतवा काढला गेला होता.