आरुषी हत्याकांड: जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 04:21 PM2017-10-12T16:21:41+5:302017-10-12T16:30:50+5:30
तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
उत्तर प्रदेश - तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र अलाहाबाद न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केलीय. तरीही संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे.
- आरुषी व हेमराज हत्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम
16 मे 2008- 14 वर्षांची आरुषी तलवार नोएडातील जलवायू विहार एल-32 या स्वतःच्या घरातील बेडरूमममध्ये मृतावस्थेत सापडली. तिचा गळा चिरण्यात आला होता. त्यावेळी नोकर हेमराजवर संशय घेण्यात आला.
17 मे 2008- नोकर हेमराज याचाही मृतदेह नोएडातील जलवायू विहार एल-32 गच्चीवर सापडला.
23 मे 2008 - आरुषीचे वडील डॉ. राजेश तलवार यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात अटक केली.
1 जून 2008-आरुषी व हेमराज हत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.
13 जून 2008- डॉ. राजेश तलवारचे कम्पाऊंडर कृष्णाला सीबीआयनं अटक केली. त्यानंतर तलवार यांचे मित्र दुर्रानी यांच्या घरातील नोकर राजकुमार व तलवार यांच्या शेजारील नोकर विजय मंडल यांनाही अटक करण्यात आली. तिघांनाही हत्याकांडातील आरोपी बनवण्यात आलं. 11 जुलै 2008- राजेश तलवार यांना गाझियाबादच्या डासना जेलमधून जामिनावर सोडण्यात आलं.
12 सप्टेंबर 2008- कृष्णा, राजकुमार व विजय मंडळ यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला. सीबीआयनं 90 दिवस चार्जशीट फाइल केली नाही. त्यानंतर 2009मध्ये सीबीआयनं दुसरी टीम बनवून त्यांच्याकडे प्रकरण सुपूर्द केलं.
10 सप्टेंबर 2010- आरुषी हत्याकांड प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट बनवली
29 डिसेंबर 2010- सीबीआयनं आरुषी हत्याकांड प्रकरणात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला.
28 फेब्रुवारी 2011- सीबीआय कोर्टानं राजेश व नुपूरविरोधात अटक वॉरंट जारी केलं. राजेश तलवार यांनी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात निषेध याचिका दाखल केली.
मार्च 2012- कनिष्ठ न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत आरुषीचे आई-वडील राजेश व नूपुर तलवार यांना हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी दोषी ठरवलं.
17 सप्टेंबर 2012- गाझियाबादच्या डासना जेलमध्ये शिक्षा भोगत असलेली आरुषीची आई नुपूर हिला न्यायालयानं जामीन दिला.
25 मे 2012- गाझियाबाद न्यायालयानं आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा राजेश व नुपूरवर ठपका ठेवला.
30 एप्रिल 2012- नुपूर यांनी स्वतः आत्मसमर्पण केलं, त्यानंतर नुपूर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं.
एप्रिल 2013- आरुषी व हेमराज यांचा खून केल्याचं सीबीआयनं न्यायालयात सांगितलं. तसेच आरुषी व हेमराज यांचे मृतदेह विचित्र अवस्थेत सापडले.
3 मे 2013- बचाव पक्षानं वकिलांच्या मागणीनुसार विशेष न्यायालयात सीबीआयचे माजी संचालक अरुण कुमार यांच्यासह 14 जणांना समन्स बजावला, मात्र सीबीआयनं याला विरोध केला.
13 मे 2013 - त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली.
10 ऑक्टोबर 2013- गाझियाबादमधील सीबीआय कोर्टात सुनावणी सुरू झाली.
26 नोव्हेंबर 2013- आरुषीचे आई-वडील राजेश आणि नुपूर तलावर यांना सीबीआयनं कोर्टानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली
21 जानेवारी 2014 - राजेश व नुपूर यांनी सीबीआय कोर्टानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली.
19 मे 2014- अलाहाबाद कोर्टानं राजेश व नुपूर तलवार यांचा जामीन फेटाळून लावत सुनावणी सुरूच ठेवली.
7 सप्टेंबर 2017- अलाहाबाद न्यायालयानं आरुषी हत्या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला.
12 ऑक्टोबर 2017- अलाहाबाद न्यायालयानं पुराव्याअभावी राजेश व नुपूर दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली.