तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:44 PM2018-12-11T14:44:39+5:302018-12-11T14:45:38+5:30
तेलंगणाचा गड राखण्यात राव पिता-पुत्रांना यश आले आहे. त्यामुळे तेलंगणात 'अब की बार केसीआर' हा नारा खरा ठरला.
हैदराबाद - तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे गजवेल मतदारसंघातून विजयी झाले आहेत. केसीआर यांनी 103916 मतं घेतली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार वंतेरु प्रताप रेड्डी यांना 55240 मतं मिळाली आहेत. त्यामुळे जवळपास 50 हजार मतांनी चंद्रशेखर राव यांनी गजवेल मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर राव यांचे पुत्र के.टी.रामारावे हेही सिरसिला मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
तेलंगणाचा गड राखण्यात राव पिता-पुत्रांना यश आले आहे. त्यामुळे तेलंगणात 'अब की बार केसीआर' हा नारा खरा ठरला. राव यांनी काँग्रेस उमेदवार वंतेरु प्रताप रेड्डी यांचा जवळपास 49 हजार मतांनी पराभव केला आहे. तर राव यांचे पुत्र केटी. रामाराव यांनी काँग्रेस उमेदवार करुणा महेंद्र रेड्डी यांचा जवळपास 85 हजार मतांनी पराभव केला आहे. रामाराम यांना 121758 मतं मिळाली असून काँग्रेसच्या रेड्डी यांना 34850 मतं मिळाली आहेत.
देशातील सर्वात तरुण राज्य असलेल्या तेलंगणात दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक होत आहे. गतवर्षी राव यांच्या टीआरएस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर, यंदाही तेलंगणात टीआरएस यांच्याच पक्षाला लोकांनी संधी दिल्याचे दिसून येत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवाडीनुसार तेलंगणात टीआरएसने 40 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला 11 जागांवर यश मिळाले आहे. तर एमआयएमने तीन जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजपला अद्याप खातेही उघडता आले नाही. पण, भाजपा उमेदवार टी. राजासिंग हे विजयाच्या वाटेवर आहेत. तेलंगणातील एकंदरीत चित्र पाहता, तेलंगणात टीआरएसला 85 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला 22 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. मात्र, भाजपाल तेलंगणात चांगलाच मार खावा लागला आहे. भाजपला केवळ दोनच जागांवर आघाडी आहे.