PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:33 PM2024-10-29T16:33:49+5:302024-10-29T16:34:18+5:30
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार मिळतील. ही सुविधा कोणत्याही उत्पन्न गटातील ज्येष्ठांसाठी उपलब्ध असेल.
AB PM-JAY: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयुष्मान योजनेच्या आयुष्मान भारत "निरामयम" (ज्याला आजार होत नाही) या नवीन टप्प्याचा शुभारंभ केला. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. आता आयुष्मान भारत या प्रमुख आरोग्य विमा योजनेंतर्गत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांनाही मोफत उपचार घेता येणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील हे मोठे पाऊल नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त आणि हिंदू वैद्यक देवता धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्ताने सुरू करण्यात आले.
दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना आरोग्य संरक्षण मिळेल. ही सुविधा कोणत्याही उत्पन्न गटातील ज्येष्ठांसाठी उपलब्ध असेल. दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध होतील. याशिवाय, जी कुटुंबे आधीच आयुष्मान योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबातील वृद्ध सदस्यांसाठी वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र उपचार मिळू शकतील. याचा फायदा देशातील सुमारे 4.5 कोटी कुटुंबांतील 6 कोटींहून अधिक वृद्धांना होणार आहे. आत्तापर्यंत या योजनेत केवळ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचा समावेश करण्यात आला होता, तर वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही.
वृद्धांना मोफत उपचार कसे मिळणार?
या योजनेसाठी वृद्धांना खास आयुष्मान कार्ड दिले जाईल, जे कौटुंबिक आयुष्मान योजनेपेक्षा वेगळे असेल. 29 ऑक्टोबरपासून ही विशेष कार्डे उपलब्ध होऊ लागली आहेत. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अनेक वृद्धांना कार्ड दिले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्यासह अनेक मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते. ही आयुष्मान कार्ड बीआयएस पोर्टल/आयुष्मान ॲपद्वारे बनविली जातील, यासाठी वृद्धांना त्यांचे आधार कार्ड आणि केवायसी अपडेट करावे लागेल. ज्या वृद्धांकडे खाजगी आरोग्य विमा आहे, त्यांना खाजगी आणि आयुष्मान भारत योजना विमा यांपैकी निवडण्याचा पर्याय असेल.