"अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार"! भाजपचा नारा; भाविकांना अयोध्येला नेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:07 AM2024-01-03T08:07:55+5:302024-01-03T08:09:20+5:30
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व राज्यांचे राज्यनिहाय मूल्यांकन करून स्थानिक पातळीवर युती करणे किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याची चर्चाही झाली.
संजय शर्मा -
नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ‘अबकी बार ४०० पार, तिसरी बार मोदी सरकार’ या घोषणेसह मैदानात उतरणार आहे. त्यासाठी सर्व लोकसभा जागांवर विधानसभानिहाय समन्वयक आणि प्रभारी नियुक्त केले जातील. बूथ मॅनेजमेंटपासून नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी व भाजपमध्ये नवीन लोकांचा समावेश करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. सर्व राज्यांचे राज्यनिहाय मूल्यांकन करून स्थानिक पातळीवर युती करणे किंवा छोट्या प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याची चर्चाही झाली.
जे. पी. नड्डा यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, सुनील बन्सल, विनोद तावडे, दुष्यंत गौतम हेही या बैठकीत उपस्थित होते.
४३० शहरांमधून ३५ विशेष रेल्वे -
- २२ जानेवारीला भाजप देशभरात दिवाळी साजरी करणार आहे. भाजप कार्यकर्ते या दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करतील.
- भाजप देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिराच्या पुस्तिकांचे वाटप करणार आहे. अयोध्या राम मंदिरासाठी भाजप आणि आरएसएसने आतापर्यंत केलेल्या संघर्षाचे चित्रण या पुस्तकात केले आहे.
- २५ जानेवारी ते २५ मार्च दरम्यान इच्छुकांना राम मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्ते उचलणार आहेत. त्यासाठी ४३० शहरांमधून अयोध्येसाठी ३५ रेल्वे चालवणार आहेत.