अबब...स्कूटीच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल १.१२ कोटी, जाणून घ्या नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 08:48 AM2023-02-18T08:48:30+5:302023-02-18T08:48:59+5:30
बोलीसाठी १००० रुपये ठेव रक्कम होती. ऑनलाइन बोलीमध्ये राज्यातील एकूण २६ जण सहभागी झाले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : स्कूटीच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल १ कोटी १२ लाख १५ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन बोली लावण्यात आली. एचपी-९९ ९९९९ या क्रमांकासाठी लावलेली बोली ऐकून मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू हेही आश्चर्यचकीत झाले आहेत.
सिमला जिल्ह्यातील कोटखाई भागात वाहनांची नोंदणी सुरू होताच व्हीआयपी क्रमांक घेण्यासाठी चढाओढ लागली. कोटखाई उप मंडळाला एचपी-९९ हा क्रमांक मिळाला आहे. वरील क्रमांकाबरोबरच ०००९ साठी २१ लाख, ०००५ साठी २० लाख, ०००३साठी १० लाख रुपयांची बोली लागली. मात्र, स्कूटीच्या क्रमांकासाठी एवढ्या मोठ्या रकमेची बोली लागल्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्य अनिल काल्टा यांचे म्हणणे आहे की, कोणीही स्कूटीच्या क्रमांकासाठी एक कोटीची बोली लावू शकत नाही.
बोलीसाठी १००० रुपये ठेव रक्कम होती. ऑनलाइन बोलीमध्ये राज्यातील एकूण २६ जण सहभागी झाले होते. कोटखाईचे एसडीएम चेतन खडवाल यांचे म्हणणे आहे की, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. तर दुसरीकडे शिवेन जैतक यांचे म्हणणे आहे की, मी एचपी-९९ ९९९९ क्रमांक घेण्यासाठी इच्छुक होतो. परंतु त्यासाठी एक कोटीची बोली लागली तेव्हा मागे हटलो. सरकारने यासाठी बोली लावणाऱ्याकडून आधी १० टक्के रक्कम वसूल केली पाहिजे.