एबीसीच्या चेअरमनपदी श्रीनिवासन के. स्वामी, ‘लोकमत’चे करण दर्डा प्रकाशक प्रतिनिधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 07:33 AM2023-09-16T07:33:53+5:302023-09-16T07:34:45+5:30
Srinivasan K. Swamy: एबीसीच्या चेअरमनपदी निवड झालेले श्रीनिवासन के. स्वामी हे सध्या एशियन फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन्सचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई - प्रसार माध्यम विश्वातील अतिशय महत्त्वाची संस्था असलेल्या ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या (एबीसी) चेअरमनपदी २०२३-२४ या वर्षासाठी आर. के. स्वामी हंसा ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्रीनिवासन के. स्वामी यांची, तर एबीसीवर प्रकाशक प्रतिनिधी म्हणून लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक व संपादकीय संचालक करण दर्डा यांची निवड झाली आहे.
एबीसीच्या चेअरमनपदी निवड झालेले श्रीनिवासन के. स्वामी हे सध्या एशियन फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन्सचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय ते यापूर्वी अन्य संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर सक्रिय होते. २०२३-२४ या वर्षासाठी एबीसीच्या डेप्युटी चेअरमनपदी रियाद मॅथ्यू यांची निवड झाली आहे. ते मल्याळम मनोरमाचे संचालक व चीफ असोसिएट एडिटर आहेत. एबीसीच्या सचिवपदी मोहित जैन (बेनेट, कोलमन अँड कंपनी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), एबीसीच्या खजिनदारपदी विक्रम सखूजा (मॅडिसन कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे पार्टनर व ग्रुप सीइओ) यांची निवड झाली.
एबीसी या संस्थेवर जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवासन के. स्वामी (आर. के. स्वामी लिमिटेडेचे सीईओ), विक्रम सखुजा (मॅडिसन कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे पार्टनर व ग्रुप सीइओ), प्रशांतकुमार (ग्रुप एम मीडिया इंडिया प्रा. लि.), वैशाली वर्मा (इनिशिएटिव्ह मीडिया प्रा. लि.) यांची निवड झाली. तसेच एबीसी या संस्थेवर प्रकाशक प्रतिनिधी म्हणून लोकमत मीडिया ग्रुपचे कार्यकारी संचालक व संपादकीय संचालक करण दर्डा, प्रताप पवार (सकाळ पेपर्स प्रा. लि.), शैलेश गुप्ता (जागरण प्रकाशन लिमिटेड), प्रवीण सोमेश्वर (एचटी मीडिया लि.), मोहित जैन (बेनेट, कोलमन अँड कंपनी लि.), ध्रुव मुखर्जी (एबीपी प्रा. लि.), गिरीश अग्रवाल (डीबी कॉर्प लिमिटेड) यांची निवड झाली.
या संस्थेवर २०२३-२४ या वर्षासाठी जाहिरातदारांचे प्रतिनिधी म्हणून करुणेश बजाज (आयटीसी लि.), अनिरुद्ध हलदार (टीव्हीएस मोटर कंपनी लि.), शशांक श्रीवास्तव (मारुती सुझुकी इंडिया लि.) यांची तर सेक्रेटरिएट विभागात होर्मुझ्द मसानी (सेक्रेटरी जनरल) यांची निवड
झाली आहे.