अपहृत भारतीय तंत्रज्ञाची सुदानमध्ये सुटका
By admin | Published: June 14, 2014 03:27 AM2014-06-14T03:27:31+5:302014-06-14T03:27:31+5:30
सुदानमध्ये तीन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले भारतीय आयटी तंत्रज्ञ इरफान जाफरी यांची सुटका झाली असून ते सध्या सुदानी अधिकाऱ्यांसोबत आहेत.
नवी दिल्ली : सुदानमध्ये तीन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले भारतीय आयटी तंत्रज्ञ इरफान जाफरी यांची सुटका झाली असून ते सध्या सुदानी अधिकाऱ्यांसोबत आहेत.
अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांचे अपहरण करून खंडणीची मागणी केली होती. इरफान यांची सुटका झाली असून ते शनिवारी खार्तूममध्ये दाखल होतील. आमचे पथक त्यांच्या संपर्कात आहे, असे टष्ट्वीट सुदानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी केले आहे. गुरुवारी जाफरी यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण खंडणी देऊ केली होती. अपहरणकर्त्यांनी मागितलेली खंडणी देण्यास आम्ही तयार आहोत. माझ्यासाठी माझे पतीच सर्व काही आहेत. खंडणी न देण्याचे भारत व संयुक्त राष्ट्रसंघाचे धोरण आम्हाला मरणाच्या दारात लोटत आहे. माझे पती मोठ्या संकटात आहेत. या काळात आम्हाला एकटे सोडून दिले असल्याचे आम्हाला वाटत आहे. आम्हाला कोणीही मदत का करत नाही, असे इरफान यांची पत्नी नफिसा जाफरी यांनी सांगितले. त्यांचा गळा दाटून आला होता.
गेल्या ११ मार्च रोजी पाच बंदूकधाऱ्यांनी एका तुर्की उपाहारगृहापासून इरफान यांचे कथितरीत्या अपहरण केले. तेव्हापासून त्यांना दारफूरच्या आदिवासी भागात ओलिस ठेवण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)