नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:05 AM2019-10-07T05:05:58+5:302019-10-07T05:10:02+5:30

जम्मूमधील स्थानबद्ध नेत्यांची सुटका केली गेल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्या नेत्यांनाही मुक्त करण्याची किंवा निदान त्यांना भेटू देण्याची विनंती केली होती.

Abdullah meets for the first time with the leaders of the National Conference | नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते प्रथमच अब्दुल्लांना भेटले

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून स्थानबद्ध केल्यानंतर दोन महिन्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका १५ सदस्यीय शिष्टमंडळाने पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला व उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची रविवारी प्रथमच भेट घेतली. राज्यामध्ये या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या गटविकास परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
जम्मूमधील स्थानबद्ध नेत्यांची सुटका केली गेल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्या नेत्यांनाही मुक्त करण्याची किंवा निदान त्यांना भेटू देण्याची विनंती केली होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ही विनंती मान्य केल्यानंतर पक्षाचे जम्मू विभागाचे प्रमुख देविंदर सिंग राणा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने अब्दुल्ला पिता-पुत्राची त्यांच्या स्थानबद्धतेच्या ठिकाणी स्वतंत्रपणे भेट घेऊन राज्यातील सद्य:स्थिती व आगामी निवडणुका यावर चर्चा केली.
या भेटीनंतर राणा यांनी सांगितले की, काश्मीरमधील राजकीय प्रक्रिया खºया अर्थाने पुन्हा गतिमान होण्यासाठी आमच्या नेत्यांना स्थानबद्धतेतून मुक्त केले जाणे गरजेचे आहे.
राणा म्हणाले की, आमच्या या नेत्यांची प्रकृती उत्तम व चितवृत्ती उल्हासित आहेत, याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे; पण राज्यातील परिस्थितीने आणि खास करून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांनी आमचे नेते उद्विग्न आहेत. आगामी निवडणुका लढवायच्या की नाहीत, हे या नेत्यांच्या सुटकेवर अवलंबून असेल, असेही त्यांनी संकेत दिले. (वृत्तसंस्था)

श्रीनगरच्या नागरिकांची आठवडी बाजारात गर्दी
सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे राज्याच्या बहुतांश भागातील जनजीवन रविवारी सलग ६३ व्या दिवशी विस्कळित राहिले; पण श्रीनगरच्या आठवडी बाजारात लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. शहरातील काही दुकानेही सकाळच्या वेळी उघडी होती. मात्र, राज्यात इतरत्र बाजारपेठा व सार्वजनिक वाहतूकव्यवस्था बंद राहिली. मोबाईल व इंटरनेट सेवाही बंद होत्या.

Web Title: Abdullah meets for the first time with the leaders of the National Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.