ABG Shipyard Scam: 'NDAच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली', एबीजी घोटाळ्यावरुन अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 04:11 PM2022-02-14T16:11:34+5:302022-02-14T16:11:43+5:30
ABG Shipyard Scam: 'एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले.'
नवी दिल्ली: सध्या देशात एबीजी शिपयार्ड प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन विरोधक केंद्रावर टीका करत आहेत. दरम्यान, यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केले. सोमवारी RBI बोर्ड सदस्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणावर बोलताना बँकांचे कौतुक केले आणि एनडीएच्या काळात बँकांमध्ये मोठी सुधारणा झाल्याचे त्या म्हणाल्या.
'यूपीएच्या काळात खाते बदलले'
यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या प्रकरणात बँकांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी या प्रकारची फसवणूक शोधण्यासाठी सरासरीपेक्षा कमी वेळ घेतला. अशा प्रकरणांचा शोध घेण्यासाठी आणि पुढील कारवाई सुरू करण्यासाठी बँकांना 52 ते 56 महिने लागतात. पण, एनडीएच्या काळात बँकांची परिस्थिती सुधारली आहे. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड खाते मोदी सरकारच्या काळात नाही, तर आधीच्या यूपीए सरकारच्या काळात एनपीएमध्ये बदलले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सीबीआयची कारवाई
विशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने अलीकडेच ABG शिपयार्ड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतरांवर ICICI बँकेच्या नेतृत्वाखालील दोन डझन कर्जदारांच्या संघाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. हा संपूर्ण घोटाळा 22,842 कोटी रुपयांचा आहे.
आठ जणांवर गुन्हा
याअंतर्गत कंपनीने 28 बँकांकडून कर्ज घेतले आहे. सीबीआयने या प्रकरणी 7 फेब्रुवारीला एफआयआर नोंदवला होता. यानंतर तपासाअंती छापे टाकून कंपनीचे माजी अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेली फसवणूक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या एकूण घोटाळ्याएवढी आहे.
काँग्रेसचा भाजपवर आरोप
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मीडिया प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी एबीजी शिपयार्ड कंपनीच्या 22 हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्याबाबत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेचा पैसा लुटायचा, मग पळून जायचे, अशा रणनीतीवर सरकार काम करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.
मोदींच्या मित्रांचे अच्छे दिन
ट्विटमधून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मोदींच्या काळात 5,35,000 कोटी रुपयांची बँकांची फसवणूक झाली आहे. जनतेच्या पैशाची एवढी हेराफेरी 75 वर्षांत कधीच झाली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदींच्या मित्रांसाठीच चांगले दिवस आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.