दिल्लीत निवासी आयुक्तपदी आभा शुक्ला
By admin | Published: January 14, 2015 12:58 AM2015-01-14T00:58:45+5:302015-01-14T00:58:45+5:30
महाराष्ट्राच्या राजधानीतील निवासी आयुक्तपदाच्या नियुक्तीवरून प्रशासकीय नाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे.
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या राजधानीतील निवासी आयुक्तपदाच्या नियुक्तीवरून प्रशासकीय नाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारने निवासी आयुक्तपदावर आभा शुक्ला यांची नियुक्ती केल्याने त्या रूजू होताच विद्यमान निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना रजेवर जाण्याचाच मार्ग शिल्लक आहे. आभा शुक्ला या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या नभोवाणी मंत्रालयात सहसचिव होत्या.
नऊ जानेवारी रोजी मलिक यांची केंद्र सरकारच्या श्रम व कामगार मंत्रालयात सहसचिव पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली. मात्र तेथील अधिकारी ३१ जानेवारीपर्यंत हलणार नसल्याने मलिक यांना तोवर रजेवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मंगळवारी सायंकाळी मलिक केंद्र व राज्य सरकारच्या एका बैठकीत होते. त्यावेळी शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश धडकला. सेवेची दोन वर्षे उरलेल्या मलिक यांची अलीकडची कारकीर्द जशी वादग्रस्त ठरली तशीच त्यांचा या पदावरील शेवट अडथळ््याचाच ठरला. मात्र याचवेळी आभा शुक्ला यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे. आभा यांचे पती लोकेशचंद्र हे या याच आयुक्तालयात राजशिष्टाचार व गुंतवणूक विभागाचे आयुक्त आहेत. अत्यंत कार्यकुशल प्रतिमा असलेल्या आभा शुक्ला या १९९३ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी असून, राज्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यावर त्या २००८ मध्ये सात वर्षांसाठी केंद्र सरकारात रूजू झाल्या.