‘अभी खेला बाकी है’, जदयू-भाजप युतीवर जवळपास शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:19 AM2024-01-28T09:19:50+5:302024-01-28T09:20:35+5:30
Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत करार केल्याचे दिसत असले तरी झपाट्याने बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचा अंतिम अध्याय अद्याप लिहिला जाणे बाकी आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत करार केल्याचे दिसत असले तरी झपाट्याने बदलणाऱ्या या राजकीय घडामोडींचा अंतिम अध्याय अद्याप लिहिला जाणे बाकी आहे. कारण, विधानसभेतील रालोआच्या बहुमत चाचणीदरम्यान पक्षाचे ४५ आमदार एकत्र राहतील याबाबत खुद्द नितीशकुमार साशंक आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी केलेले ‘अभी खेला बाकी है’ हे विधान त्याचे सूचक आहे. याचाच दुसरा अर्थ असा की नितीशकुमार यांचे काही आमदार विविध कारणांमुळे राजद आणि काँग्रेससोबत जाऊ इच्छितात.
नितीशकुमार यांच्या जदयूसोबत युती केल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रालोआ बिहारमधील सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकेल असे भाजपला वाटते. त्यामुळेच केंद्रीय भाजप नेतृत्व नितीशकुमारांसोबत युती करण्यास उत्सुक आहे. या दोन्ही पक्षांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवत ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. बिहारमधील नव्या सरकारमध्ये नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदी राहू देऊ नये, अशी भाजपमधील अनेकांची इच्छा आहे. नितीश यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. पक्षाने लोकसभेची निवडणूक एकट्याने लढण्याची वेळ आली आहे, असे गिरीराज सिंह यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांसह पक्षातील अनेक आमदारांचे मत आहे. नितीशकुमार यांच्यासोबत युतीचा निर्णय घेतला गेला असला तरी भाजपचे केंद्रीय नेतृत्व आपले आमदार आणि खासदारांचे म्हणणे जाणून घेण्यासही उत्सुक आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष कोणतेही वक्तव्य जारी करण्यापूर्वी नितीशकुमार यांच्या अंतिम पावलाची वाट पाहत आहेत.