"अभिनंदनचा पाकिस्तानी लष्कराने केला अतोनात छळ, झोपूही नाही दिले"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:02 AM2019-03-08T06:02:00+5:302019-03-08T06:02:10+5:30
भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याआधी पाकिस्तानी लष्कराने गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतोनात छळ केला.
नवी दिल्ली : भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याआधी पाकिस्तानी लष्कराने गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतोनात छळ केला. त्यांना झोपू दिले नाही, एका ठिकाणी डांबून ठेवले व मारहाणही केली; परंतु ते मोठ्या धैर्याने या छळाला सामोरे गेले.
भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पााकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.
पाकिस्तानने एफ-१६ लढाऊ विमान पाडल्यानंतर त्यांचे मिग-२१ विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी परॉशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले.
>अशा स्थितीत शत्रूच्या ताब्यात सापडल्यानंतर कसे वागावे आणि शत्रूला हवी असलेली माहिती देण्याची कशा प्रकारे टाळाटाळ करावी, याचे लढाऊ वैमानिकांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार न डगमगता अभिनंदन वागले. पाकिस्तानी लष्कराच्या तीन-चार पथकांनी त्यांची कसून चौकशी केली. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी त्याची चौकशी करीत असल्याचे दिसते. पाकिस्तानच्या वायू दलाचे अधिकारीही त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत होते. तथापि, ते अधिक वेळ पाकिस्तानी लष्कराच्याच ताब्यात होता.