अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र; मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्यचक्र; जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:49 AM2021-11-23T10:49:35+5:302021-11-23T10:59:19+5:30
शूर जवान तसेच अधिकाऱ्यांना वीर चक्र, शौर्यचक्र, कीर्तिचक्र, अशोकचक्र आदी पदके देऊन सन्मानित करण्यात येते. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला.
नवी दिल्ली : २०१९ साली भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांपैकी एफ-१६ विमान पाडण्याचा भीमपराक्रम करणारे भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीरचक्र देऊन गौरव केला. तसेच सहा कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या कारवाईचे प्रमुख मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्यचक्र तर मेजर विभूतीशंकर धोंडियाल, नायब सुभेदार सोम्बिर यांना मरणोत्तर शौर्यचक्र तर शूर जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले.
शूर जवान तसेच अधिकाऱ्यांना वीर चक्र, शौर्यचक्र, कीर्तिचक्र, अशोकचक्र आदी पदके देऊन सन्मानित करण्यात येते. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळ उद् ध्वस्त केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.
महाराष्ट्रातील दोन जवानांचा सन्मान -
- मेजर महेशकुमार भुरे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत त्यांच्या नेतृत्वाखालील जवानांच्या पथकाने ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
२९ नोव्हेंबर २०१८ रोजी काश्मीरमध्ये रेडबानी बाला गावामध्ये एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शूर जवान प्रकाश जाधव हे शहीद झाले. सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले.