अभिनंदन यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला मिळणार पुरस्कार, बालाकोट हल्ल्यातील कामगिरीचाही होणार गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:01 AM2019-10-07T05:01:58+5:302019-10-07T05:05:02+5:30
पाकिस्तानच्या विमानांनी भारतावर हल्ला करायचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी रोजी हाणून पाडला होता.
नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानचा प्रतिहल्ला विफल करणाऱ्या व त्या देशाचे एफ-१६ विमान पाडणा-या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ५१ व्या स्क्वाड्रनला भारतीय हवाई दलदिनी ८ आॅक्टोबरला हवाई दलप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्या विमानांनी भारतावर हल्ला करायचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाच्या विमानांनी २७ फेब्रुवारी रोजी हाणून पाडला होता. या महापराक्रमाबद्दल हवाई दलाच्या ५१ व्या स्क्वाड्रनचे कमांडिंग आॅफिसर ग्रुप कॅप्टन सतीश पवार हे हा पुरस्कार स्वीकारतील.
बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दहशतवादी तळ भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केले. त्यानंतर दुसºयाच दिवशी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांनी भारतावर हल्ला चढविण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यात आला.एफ-१६ सारखे अत्याधुनिक विमान भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ विमानाने पाडले. ही कामगिरी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी केली होती. त्यांचे विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आले. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैनिकांनी अटक केली. मात्र भारताने दाखविलेल्या कणखर भूमिकेमुळे त्यांची १ मार्च रोजी पाकिस्तानने सुटका केली. त्यानंतर त्यांनी सहा महिने विश्रांती घेतली. प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर ते २ सप्टेंबर रोजी पुन्हा सेवेत रुजू झाले.
तत्कालीन हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांच्यासोबत त्यांनी मिग-२१ विमानातून उड्डाणही केले. पाकिस्तानशी मुकाबला केल्याबद्दल अभिनंदन यांना स्वातंत्र्य दिनी वीरचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
होते.
६०१ सिग्नल युनिटचाही होणार सन्मान
बालाकोट हल्ल्यामध्ये तसेच पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाºया स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांच्या ६०१ सिग्नल युनिटलाही भारतीय हवाई दलदिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पाकिस्तानी विमाने भारतावर चाल करून येत आहेत हे शोधून काढण्यात मिंटी अग्रवाल यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. बालाकोटवरील हल्ल्यामध्ये नऊ क्रमांकाच्या स्क्वाड्रनचे मिराज २००० विमान सहभागी झाले होते. या स्क्वाड्रनलाही पुरस्कार प्रदान करण्यात येईल.