अनुपम खेर यांच्यानंतर अभिषेक बच्चनचं ट्विटर अकाऊंट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 10:17 AM2018-02-08T10:17:01+5:302018-02-08T10:21:19+5:30
पाकिस्तान समर्थक तुर्की सायबर आर्मी 'अयिल्दिज टीम'ने ज्युनिअर बच्चनचं अकाऊंट हॅक केलं होतं. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी कव्हर फोटो बदलत एका मिसाइलचा फोटो वापरला होता, ज्यावर 'अयिल्दिज टीम' असं लिहिण्यात आलं होतं.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्यानंतर आता अभिषेक बच्चनचंही ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं. पाकिस्तान समर्थक तुर्की सायबर आर्मी 'अयिल्दिज टीम'ने ज्युनिअर बच्चनचं अकाऊंट हॅक केलं होतं. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी कव्हर फोटो बदलत एका मिसाइलचा फोटो वापरला होता, ज्यावर 'अयिल्दिज टीम' असं लिहिण्यात आलं होतं. यानंतर ट्विटरने लक्ष घालत हॅक झालेलं अकाऊंट पुर्ववत केलं. अभिषेक बच्चनने पुर्ववत झालेल्या आपल्या अकाऊंटवरुन ट्विटरचे आभार मानले आहेत.
ट्विटरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'आमची टीम काही भारतीय युजर्सची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्यांना फटका बसला आहे त्या युजर्सना आम्ही संपर्क साधू.'. ट्विटरने यासोबतच अनोळखी व्यक्तींकडून येणा-या लिंक ओपन न करण्याचं आवाहन केलं आहे.
Yes, yes my account got hacked. Quite chuffed that they thought me interesting enough actually 😉. All sorted out now and back to normal. Well.... As normal as it can get. 😁
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) February 7, 2018
Thank you for your concern.
याआधी मंगळवारी अनुपम खेर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेता आणि भाजपाचे महासचिव राम माधव सोबतच वरिष्ठ पत्रकार आणि खासदार स्पपन दासगुप्ता यांची ट्विटर खाती हॅक झाली होती. अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचंही अकाउंट सस्पेंड केलं होतं.
To every one on twitter: please don’t open any link sent on your direct messages, however genuine they appear. That is the tool hackers are using to hack into your account. Please share this message with as many people as you can. Thanks 🙏
— GT (@GautamBThakker) February 7, 2018
अनुपम खेर यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली होती. 'माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. मी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे, भारतातील माझ्या काही मित्रांकडून मला याबाबत समजलंय, ट्विटरला याबाबत मी कळवलं आहे', अशी माहिती त्यांनी दिली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी स्वतःला तुर्की येथील असल्याचं म्हटलं आहे. तुमचं अकाउंट तुर्की येथील 'सायबर आर्मी आयदिस तिम' द्वारा हॅक करण्यात आलं आहे. तुमचा महत्वाचा सर्व डेटा आम्ही मिळवला आहे असं ट्विट हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटवरून केलं होतं. पण ट्विटच्या अखेरीस 'आय लव्ह पाकिस्तान' असं लिहिण्यात आलं आहे, तसंच ट्वीट्समध्ये तुर्कीचा झेंडा आणि बंदूक पकडलेले दहशतवादी मिसाइल दिसत होते.