अबूचा खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालवावा - एनआयए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2015 03:12 AM2015-07-18T03:12:06+5:302015-07-18T03:12:06+5:30
लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी तथा २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड अबू जिंदाल याच्या जिवाला धोका असल्याने खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालवावा अशी
नवी दिल्ली : लष्कर-ए-तय्यबाचा अतिरेकी तथा २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमार्इंड अबू जिंदाल याच्या जिवाला धोका असल्याने खटला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालवावा अशी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली न्यायालयाला शुक्रवारी केली.
अबू जिंदाल ऊर्फ सय्यद झैबुद्दीन अन्सारी सध्या मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असून त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्याला दिल्लीच्या न्यायालयात हजर करता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मे २०१३ साली पारित केलेल्या ठरावात प्रतिस्पर्धी गटाकडून त्याचे अपहरण आणि हत्या होण्याची भीती व्यक्त करतानाच त्याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर न करण्याचा निर्णय घेतला होता, याकडेही या संस्थेने लक्ष वेधले. दुसरीकडे जिंदालचे वकील एम.एस. खान यांनी बाजू मांडताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याला विरोध दर्शविला. मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या आधारे माझ्या अशिलाची बाजू योग्य प्रकारे मांडता येणार नाही, त्याचा बचावावर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले. मी अबू याला पत्र पाठवून त्याचे मत मागणार आहे, असे खान यांनी म्हटल्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी ५ आॅगस्ट रोजी निश्चित केली आहे. (वृत्तसंस्था)