देशातील 12 % नागरिक 'पिण्याच्या पाण्यापासून वंचित', घराजवळ मिळेना पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:34 AM2019-09-25T10:34:09+5:302019-09-25T10:34:58+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो
इंग्लडमधील एका स्वयंसेवी संस्थेने नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या पाण्याबद्दल सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, 12 टक्के भारतीयांना किंवा 163 दशलक्ष नागरिकांना घराजवळ पिण्याचे स्वच्छ पाणीदेखील मिळत नसल्याचे म्हटले आहे. देशातील बहुतांश भागातील पाण्याची परिस्थीत विदारक असल्याचंही 'वॉटर एड' या संस्थेनं आपल्या सर्वेक्षणातून म्हटलं आहे. विशेष म्हणजे संस्थेनं औरंगाबाद जिल्ह्यातील साक्षी आणि सिद्धार्थ यांच उदाहरण देत दुष्काळस्थिती दर्शवली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी येथील दोन चिमुकल्या मुलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी चक्क गावापासून 14 किमी लांब रेल्वेनं प्रवास करावा लागतो. 9 वर्षीय साक्षी गरुड आणि तिचा शेजारी सिद्धार्थ ढगे (10) हे दररोज केवळ पाणी आणण्यासाठी रेल्वेने जातात. आपल्यासोबत नेलेले हांडे भरून पुन्हा गावाकडे परत येतात. पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना एवढ्या दूरचा प्रवास करावा लागतो, ही बाब अत्यंत दुर्दैवी असून मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचं वास्तव मांडणारी आहे. यंदा मराठवाड्यातील काही भागात गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
पाण्यासाठी होणारी वणवण जाणारा द्यावा लागणारा वेळ, हे मला आवडत नाही. पण, दुसरा पर्यायच नाही, असे चिमुकला सिद्धार्थ म्हणतो. तर शाळेतून आल्यानंतर मला खेळायला वेळच मिळत नाही, कारण पाणी आणण्यासाठी जाणं हे माझं दैनिक काम झाल्याचं गरुड हिने सांगितलंय. इंग्लंडस्थित एका स्वयंसेवी संस्थेनं सिद्धार्थ आणि साक्षी यांच्यासारखीच दुष्काळी परिस्थिती देशातील बहुतांश भागात असल्याचं म्हटलं आहे. देशातील 12 टक्के नागरिक किंवा 161 दशलक्ष लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीही राहत्या घराजवळ मिळत नाही, असे वॉटर एड संस्थेनं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक घरात पाईपाने पाणीपुरवठा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी 3.5 ट्रिलियन्स रुपयांचा खर्च करण्यात येणार असून 2024 पर्यंत हे पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. मात्र, खासगी पाणी पुरवठा किंवा विकतचे पाणी घेणे हे सिद्धार्थ आणि साक्षी यांच्यासारख्या कुटुंबीयांना परवडणारं नाही, असे त्यांच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.