कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२ हजार कोटी थकले
By admin | Published: February 19, 2015 12:22 AM2015-02-19T00:22:09+5:302015-02-19T00:22:09+5:30
आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे.
नवी दिल्ली : आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून १.६७ कोटी टन झाले आहे. तथापि, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या थकबाकीचा आकडा १२,३०० कोटींवर गेला आहे.
भारतीय साखर कारखाना संघाच्या (इस्मा) माहितीनुसार मागच्या वर्षात भारतात याच अवधीत ४५.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या विपणन वर्षात (२०१४-१५ आॅक्टोबर ते सप्टेंबर) साखरेचे उत्पादन २.६ कोटी टन होईल, असा अंदाज इस्माने मागच्या महिन्यात व्यक्त केला होता. मागच्या वर्षात (२०१३-१४) साखरेचे उत्पादन २.४३ कोटी टन झाले होते. इस्माने जारी केलेल्या निवेदनानुसार ५१८ साखर कारखान्यांत १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत १६७.०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात या अवधीपर्यंत ४२.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले .ब्राझीलनंतर भारत हा जगातील सर्वांत दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे.
महाराष्ट्रात मागच्या वर्षात ४९.८ लाख साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात ६५ लाख टन उत्पादन झाले असून कर्नाटकात २८.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या भावानुसार १२,३०० कोटी रुपये थकले आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास थकीत बिलाचा आकडा १३,००० कोटींवर जाईल. दरवर्षी मार्चअखेर थकीत बिलाचा आकडा वाढलेला असतो.