३0 टक्के गाड्या धावतात विलंबाने रेल्वेचीच माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:47 AM2018-05-05T02:47:26+5:302018-05-05T02:47:26+5:30
देशात ३० टक्के रेल्वेगाड्या वेळेवर निघत नसल्याची व वेळेत पोहोचत नसल्याची दखल घेत, रेल्वे बोर्डाने वेळापत्रकात शिस्त आणण्याचे ठरवले आहे. सन २०१७-२०१८ मध्ये गाड्या मूळ ठिकाणाहून शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्याचा अनुभव तर फारच वाईट होता.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - देशात ३० टक्के रेल्वेगाड्या वेळेवर निघत नसल्याची व वेळेत पोहोचत नसल्याची दखल घेत, रेल्वे बोर्डाने वेळापत्रकात शिस्त आणण्याचे ठरवले आहे. सन २०१७-२०१८ मध्ये गाड्या मूळ ठिकाणाहून शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्याचा अनुभव तर फारच वाईट होता. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात फक्त ७२ टक्के रेल्वे व एक्स्प्रेस रेल्वेच वेळेवर धावल्या, तर बाकी सर्व गाड्या विलंबाने धावल्या.
त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक कसे पाळले जाईल हे पाहण्यासाठी लवकरच रेल्वे बोर्ड विभागीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. अर्थात तिची तारीख ठरलेली नाही. पीयूष गोयल रेल्वेमंत्री झाल्यापासून रेल्वेचे वेळापत्रक पाळले जाण्यात लक्षणीय घट झाली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात गाड्या वेळापत्रकानुसार धावण्याचे प्रमाण चांगले होते. आकडेवारीनुसार प्रभू मंत्री असताना ७८ टक्के रेल्वे वेळवर धावायच्या. रेल्वेमार्गांची नियमित देखभाल होत असतानाचा हा काळ होता. देखभालीचा परिणाम रेल्वेच्या धावण्यावर होत असतो.