Coronavirus Vaccine : गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 03:24 PM2022-04-08T15:24:13+5:302022-04-08T15:24:43+5:30
१८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus Patient) मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तर दुसरीकडे कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता कोविडचे सर्व निर्बंधही हटवले आहेत. असं असलं तरी आता सर्वसामान्यांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. १८ वर्षांवरील सर्वांना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. १० एप्रिल पासून सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर (प्रिकॉर्शनरी) डोस देण्यात येईल.
१८ वर्षांवरील ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. परंतु हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस खासगी लसीकरण केंद्रांमध्ये घेता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याशिवाय कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या, तसंच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहिल आणि त्याला गती दिली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Those who are 18 years of age & have completed 9 months after the administration of second dose, would be eligible for precaution dose at private vaccination centres: Ministry of Health
— ANI (@ANI) April 8, 2022
पूनावाला यांनीही केली होती विनंती
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. "देशानं योग्य लस निवडली म्हणूनच यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे," असं ते म्हणाले होते. "बूस्टर डोसबद्दल आम्ही सरकारकडे आवाहन केलं आहे. कारण ज्यांना प्रवास करणं आवश्यक आहे त्यांना बूस्टर डोसची गरज आहे. आपण सरकार सोबत चर्चा करत असून लवकरच बूस्टर डोसवर एक धोरण घोषित केलं जाऊ शकतं," असंही ते म्हणाले होते.